---Advertisement---
एरंडोल : वंजारी महासंघाचे दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे अहिल्यानगर येथे २५ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर पहिल्या संमेलनाचे मावळते अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी प्रा. वा. ना. आंधळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले.
वंजारी समाज हा महाराष्ट्रासह काही राज्यात वास्तव्यास असून अतिशय संघर्षातून व कष्टातून वाट काढीत स्वतःची ओळख निर्माण करीत आलाय. वर्तमानी समाज स्तर शिक्षणाने उंचावलाय हे जरी खरे असले तरी समाजातील शेतकरी शेतमजूर व शिक्षित बेरोजगार सांख्यिकीदृष्ट्या खूप आहेत. अशा वंचित घटकास न्याय मिळावा व तो बरोबरीने यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून संमलनाचे सदरचे आयोजन असल्याचे मत कवी प्रा. वा. ना. आंधळे यांनी व्यक्त केले. २५ ऑगस्टला नगर येथे वंजारी महासंघाचे दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्या अनुषंगाने ते बोलत होते.
ते आपल्या मनोगतात पुढे म्हणाले की, साहित्याचं ऋण अवघ्या मानव जातीवर असून, साहित्यामुळेच मानवी जीवन आणि मन प्रत्येक काळात उन्नत होत गेलंय. यातून मिळणारा आनंद दृढ व्हावा व समाजभान समृद्ध व्हावे. यासाठी संमलनाचे हे दुसरे सक्षम पाऊल आहे, असे सांगत संमेलनास समाजातल्या बंधू भगिनींना उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
संस्थापक अध्यक्ष गणेश खाडे
अहिल्यानगर शहरात २५ ऑगस्ट रोजी सकाळी नऊपासून सायंकाळपर्यंत होणाऱ्या साहित्य संमेलनात साहित्य दिंडी, उद्घाटन, कथाकथन, परिसंवाद, कविसंमेलन यातून वाङ्मयीन मेजवानी मिळणार असल्याचे वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष गणेश खाडे यांनी सांगितले.
संमेलनाचे अध्यक्ष नांदेड येथील सुप्रसिद्ध साहित्यिका प्रा.डॉ. संगीता घुगे व उद्घाटक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.डॉ. गजाननराव सानप यांसह प्रमुख मान्यवर म्हणून नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार नीलेश लंके, माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार मोनिका राजळे, रोहित पवार, मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ. नवनाथ आघाव, गणेश खाडे, पहिल्या मराठी साहित्य संमलनाचे मावळते अध्यक्ष सुप्रसिध्द कवी प्रा.वा.ना. आंधळे तसेच नाशिक येथील सुप्रसिद्ध उद्योजक बुधाजीराव पानसरे या मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती असणार आहे.
हे संमेलन सर्वार्थान यशस्वी व्हावे म्हणून संमेलनाचे स्वागताध्यक्ष विश्वविजेते कुस्ती खेळाडू राजकुमार आघाव पाटील, सहस्वागताध्यक्ष रेणुका वराडे, सहस्वागताध्यक्ष घनश्याम बोडके, निमंत्रक जिल्हाध्यक्ष मल्हारी खेडकर, युवा जिल्हाध्यक्ष अर्जुन वायभासे प्रयत्नशील आहेत.