जळगाव शहरात चोरटे सुसाट : ५ दिवसात गोलाणीमधून ३ दुचाकी लंपास

जळगाव : गोलाणी मार्केटपरिसरात दुचाकी चोरट्यांची धूम सुरुच आहे. २३ ते २७ जुलै या पाच दिवसात चोरट्यांनी चक्क तीन दुचाकी चोरुन नेल्या. या घटनांनी वाहनधारक धास्तावले असून घबराट निर्माण झाली आहे.

यमुना अशोक पाटील (वय ४९, रा. पंढरपूरनगर) यांच्या मालकीची दुचाकी (क्रमांक एमएच १९ डीएन १४०३) ही शनिवार, २७ रोजी गोलाणी मार्केट येथे अपना ज्युस सेंटरसमोर रोडवर सार्वजनिक ठिकाणी लावली होती. दुपारी अडीच ते पावणे तीन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी हॅण्डल लॉक तोडून ही दुचाकी लंपास केली. या प्रकरणी रविवार, २८ रोजी तक्रारीनुसार
शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्सटेबल गजानन बडगुजर हे करीत आहेत.
घटना क्रमांक एक मायटी ब्रदर्स समोर गोलाणी मार्केटच्या पार्किंगमध्ये रमेश मंगरेश मौर्या (वय २३, रा. हॅप्पी कॉलनी, ऑटोनगर) यांनी मंगळवार, २३ रोजी सकाळी आठ वाजता त्यांची दुचाकी (क्रमांक एमएच १९ एसी ०५६५) लावली होती. चोरट्यांनी हॅन्डललॉक तोडून ती चोरुन नेली. रात्री अकरा वाजता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शुक्रवार, २६ रोजी शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.

घटना क्रमांक दोन

सुरेश दर्शनलाल वालेचा (वय ४६, रा. सिंधीकॉलनी) हे व्यावसायिक आहेत. शनिवार, २७ रोजी सायंकाळी सात वाजता ते त्यांच्या मालकीची दुचाकी (क्रमांक एमएच १९ सीबी ४३१५) ने शहरात आले. मायटी ब्रदर्स समोर गोलाणी मार्केट विंगमध्ये त्यांनी ही दुचाकी लावली होती. रात्री ते दहा वाजता दुचाकी घेण्यासाठी आले असता त्यांना दुचाकी दिसली नाही. शोध घेतला असता तपास लागला नाही. या प्रकरणी शनिवार, २७ रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पाच दिवसात गोलाणी मार्केट परिसरातून तीन दुचाकी चोरट्यांनी चोरुन नेल्याने व्यावसायिकांसह नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. चोरटे दुचाकी लांबविण्यासाठी या परिसरात टपून बसले की काय? ि अशी शंका यावी, अशा पध्दतीच्या घटना घडताहेत. याप्रकारांनी भीती निर्माण झाल्याची भावना काही व्यावसायिकांनी व्यक्त केली.
शहराच्या अन्य परिसरातही दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. यात प्रामुख्याने नवीन बसस्थानक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, खाजगी हॉस्पिटल येथे अधिक दुचाकी लंपास झाल्या आहेत. रुग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांच्या किंवा रुग्णाच्या कुटुंबातील दुचाकी यापूर्वी गु चोरुन नेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकारांनी वाहनधारक काळजीने भयग्रस्त झाले आहेत