खुशखबर ! जळगाव जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना दिलासा; पालकांमध्ये उत्साह

जळगाव : जिल्हा परीषद शाळेतील १ लाख ८२ हजार १८५ विद्यार्थ्यांना बूट व मोजेसाठी झेडपीला ३ कोटी ९ लाख ७१ हजारांचा निधी प्राप्त झाला असून, लवकरच विद्यार्थ्यांना बूट, मोजे मिळणार आहेत. तर पुढील आठवड्यात शालेय गणवेश उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे जिल्हा परीषद शाळेतील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना १६ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार १७० रुपये प्रति विद्यार्थी याप्रमाणे बूट खरेदीसाठी अनुदान देण्यात आले आहे. यात विद्यार्थ्यांना बूटसह दोन मोजे मिळणार आहेत. यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. त्यानंतर आता बूट उपलब्ध झाले आहेत.

पुढील आठवड्यात शालेय गणवेश उपलब्ध होणार आहेत. जिल्हाभरात १५ जूनपासून जि.प.शाळा सुरू झाल्या आहेत. या विद्यार्थ्यांना सर्व पुस्तके, गणवेश, बूट सर्व सुविधा मिळत असल्याने पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर गणवेशाची प्रतीक्षा मात्र अद्यापही कायम असून वाट बघितली जात आहे.