जळगाव : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूकीसाठी 30 जानेवारी रोजी मतदान होणार असून 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. सदरची निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत मद्य विक्री करण्यास मनाई/ कोरडा दिवस जाहिर करणे बाबत लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 135 (सी) अन्वये तरतुद करणेत आली आहे.
त्यानुसार जळगव जिल्ह्यात दिनांक 28 जानेवारी, 2023 रोजी दुपारी 4.00 वाजेपासुन ते 30 जानेवारी, 2023 रोजी संपूर्ण दिवस जिल्ह्यात अबकारी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद राहतील, तसेच 2 फेब्रुवारी, 2023 रोजी मतमोजणी संपेपर्यंत (ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे) त्या परिक्षेत्रातील अबकारी मद्यविक्री अनुज्ञप्त्या मतमोजणी संपेपर्यंत बंद राहतील. जिल्हयातील सर्व संबंधित मद्यविक्री अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी.
जे अनुज्ञप्तीधारक या आदेशाची अंमलबजावणी करणार नाहीत किंवा सदर आदेशाचे उल्लघन करतील, त्यांच्याविरुद्ध मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 54(1) (सी) नुसार आवश्यक कारवाई करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.