धुळे: गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे धुळ्यातील मोहाडी हद्दीतील अवधान एमआयडीसीतील एम. ६३ या जागेवरील शौर्य डेअरीतून केमिकल व मिल्क पावडरच्या माध्यमातून तयार केलेले सुमारे ३०० किलोहून अधिक पनीर जप्त केले. गुढीपाडवा तसेच रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सहा संशयितांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
केमिकलद्वारे पनीर बनवल्याचा संशय
गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत संशयित हे फर्टिलायझरसाठी उपयोगी येणाऱ्या केमिकलद्वारे पनीरची निर्मिती करीत असल्याचा संशय आहे. शिवाय मिल्क पावडरचा उपयोग करून मोठ्या प्रमाणावर पनीरची निर्मिती करून त्याची विक्री झाल्याचा संशय आहे. अन्न व औषध प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त संदीप देवरे, अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर, जिल्हा दूध भेसळ समितीचे अमित पाटील आदींनी धाव घेत पाहणी केली.
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, सतीश जाधव, श्याम निकम, हवालदार दिनेश परदेशी, सुरेश भालेराव, कैलास महाजन, अमोल जाधव, किशोर पाटील, संदीप पाटील, नितीन धिवसे, योगेश जगताप, मायूस सोनवणे आर्दीच्या पथकाने केली
धुळेकरांच्या आरोग्याशी खेळ
धुळ्यातील या डेअरीतून दररोज सुमारे ३०० किलोहून अधिक केमिकलयुक्त पनीर तयार करून त्याची महामार्गावरील हॉटेल्स, ढाब्यांसह तसेच दूध डेअरीवर विक्री होत असल्याचा संशय आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या पनीरचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतील व त्यात पनीरमध्ये हानिकारक केमिकल्सचे अंश आढळल्याचा अहवाल येताच संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई होईल, असे सूत्रांनी सांगितले. तीन पार्टनर ही डेअरी चालवत होते. बनावट पनीरसाठी युपीतील तीन कारागिरांना नियुक्त केल्याचे कारवाईत स्पष्ट झाले आहे.
३०० किलो साठा जप्त
गुढीपाडवा व रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर दूध व दुग्धजन्यपदार्थ असलेल्या पनीरसह खवा व मावा आदींना मोठी मागणी पाहता बाजारात बनावट पनीर विक्री होत असल्याची व ते अवधान एमआयडीसीतील एका डेअरीत तयार होत असल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती. धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी भल्या सकाळीच मोहाडी हद्दीतील अवधान एमआयडीसीतील शौर्य डेअरीत पथकाने छापेमारी करीत सुमारे ३०० किलो पनीरचा साठा जप्त केला
धुळेकरांच्या आरोग्याशी खेळ! अवधान डेअरीतून ३०० किलो बनावट पनीर जप्त
by team
Published On: मार्च 30, 2025 12:07 pm

---Advertisement---