जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्षास प्राप्त 516 अर्जापैकी 300 निकाली

राहुल शिरसाळे
जळगाव : सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे अधिक लोकाभिमुख पारदर्शक व गतीमानतेने पूर्ण होण्यासाठी जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रिय कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आले आहे. या कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या नावाने येणाऱ्या नागरिकांच्या निवेदनाची दखल घेत ती तात्काळ मुख्यमंत्र्याच्या कार्यालयाकडे पाठविण्यात येतात. सोबतच त्याचा पाठपुरावा करून शासनाच्या निर्णयाची माहिती सबंधित नागरिकांना देण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना गतिमान सरकारचा प्रत्यय येत आहे.

असे आहे मुख्यमंत्री सचिवालय
जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सचिवालयात निवासी उपजिल्हाधिकारी हे पदसिध्द विशेष अधिकारी असून, नायब तहसिलदार राहुल सोनवणे व महसूल सहाय्यक, अव्वल कारकून महेश सपकाळे यांची या कक्षाकरिता नियुक्ती करण्यात आलेली आहे.

जि.प., मनपा विरोधात सर्वाधिक तक्रारी
जिल्ह्यातून 27 डिसेंबर 2022 पासून 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत 516 अर्ज मुख्यमंत्री सचिवालय कक्ष येथे प्राप्त झाले आहेत. यात सर्वाधिक जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, पोलीस अधीक्षक कार्यालय व कृषी विभागाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

सर्वसामन्य जनतेच्या प्रश्नांचा होतोय निपटारा
राज्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे व त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदन आदी कार्यवाहीमध्ये अधिक लोकाभिमुख, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून परिणामकारक निपटारा होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रिय कार्यालय स्थापना करण्यात आले आहे.

516 अर्जापैकी 300 अर्ज निकाली
मुख्यमंत्री सचिवालय कक्षात 27 डिसेंबर 2022 पासून 30 नोव्हेंबर 20243 पर्यंत 516 अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील संबंधित कार्यालयाकडे 400 अर्ज पाठविण्यात आले आहेत. यातील 300 अर्ज त्या त्या कार्यालयांनी निकाली काढले आहेत. या विभागांकडे 100 अर्ज प्रलंबित आहेत. तसेच 70 अर्ज 1 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी प्रलंबित आहेत. 116 पत्र हे मुंबई येथे मुख्यमंत्री सचिवालय येथे पाठविण्यात आले आहेत.

यापुढे सर्वसामान्य जनतेने मुख्यमंत्री यांना सादर करावयाचे, आपले दैनदिन प्रश्न शासनस्तरावर असलेली कामे व त्यासंदर्भातील प्राप्त होणारे अर्ज, निवेदन मंत्रालय, मुंबई येथे सादर न करता, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष जळगाव येथे सादर करावीत असे, आवाहन करण्यात आले आहे.
राहुल सोनवणे, नायब तहसिलदार, मुख्यमंत्री सचिवालय, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव.