कोरोना काळात 40 हजार रुग्णांना दिले जेवणाचे मोफत घरपोच डबे!

तरुण भारत लाईव्ह । रामदास माळी । जळगाव, कोरोना काळातील पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत लॉकडाऊन आणि भीतीमुळे रुग्णालयातील आणि होम क्वॉरंंटाईन असलेल्या रुग्णांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र या काळात वर्धमान धाडीवाल मित्र मंडळाने कोरोना रुग्णांना घरपोच आणि रुग्णालयात एका फोनवर जेवणाच्या डब्याची सुविधा उपलब्ध करून दिली. या मित्र मंडळाने कोरोना काळातील दोन्ही लाटेत 40 हजारांपेक्षा जास्त रुग्णांना संपर्क साधल्यानंतर लागलीच मोफत जेवणाचे डबे उपलब्ध करून दिले. त्यामुळे वर्धमान धाडीवाल मित्र मंडळाचा हा सामाजिक उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत वर्धमानभाऊ धाडीवाल मित्र मंडळाने दिवसाला 700 डबे रुग्णांना दिले. त्या अनुषंगाने दोन महिन्यात 42 हजार जेवणाचे डबे रुग्णांना देण्यात आले. वर्धमान धाडीवाल मित्र मंडळाने जेवणाचा डबा हवा असलेल्या रुग्णालयातील आणि गृह अलगीकरणात राहणार्‍या रुग्णांसाठी चाळीसगाव शहरात ही सेवा दिली. पहिल्या लाटेत हॉटेल, खानावळ आणि जेवण बनावणार्‍या सर्व सुविधा बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे गृह अलगीकरण आणि रुग्णालयात दाखल झालेल्या खासगी रुग्णायालयातील रुग्णांचे प्रचंड हाल झाले होते. मात्र शहरात वर्धमान धाडीवाल मित्र मंडळाने खासगी रुग्णालयात आणि होम क्वॉरंंटाईन असलेल्यांसाठी डबे पुरविण्याची संकल्पना राबवित अन्नछत्र सुरू केल्याने या काळात जनतेला मोठा दिलासा मिळाला. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत लॉकडाऊन झाले नाही. त्यामुळे जेवणाच्या डब्यांची मागणी कालांतराने कमी झाली. मात्र रुग्णांसाठी ही सेवा अवितरत सुरू ठेवण्याचा मित्र मंडळाने मानसही व्यक्त केला आहे. त्यांनी राबविलेल्या उपक्रमाने समाजापुढे मोठा आदर्श ठेवला आहे.

माणसातील माणुसकी
जपणारे मित्र मंडळ कोरोना काळात माणूस माणसापासून लांब गेल्याचे आपण अनेक उदाहरणे पाहिली. जवळचा नातेवाईकही या रुग्णांना सेवा देण्यास धजावत नव्हता. मात्र वर्धमान धाडीवाल मित्र मंडळाने माणुसकी जपत या दोन्ही लाटेत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना घरपोच जागेवर डबे देण्याची हिंमत केली. त्यामुळे माणुसकी जपणार्‍या धाडीवाल मित्र मंडळाच्या उपक्रमास आणि त्यांच्या मित्र मंडळातील कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वास नव वर्षानिमित्त सलाम.

उपक्रमासाठी यांनी घेतले परिश्रम
उपक्रमासाठी धाडीवाल मित्रमंडळाचे प्रमुख वर्धमान धाडीवाल यांच्यासह दिलीप घोरपडे, लक्ष्मण शिरसाठ, विजय गवळी, गणेश गवळी, गजानन मोरे, विनोद शिंपी, सतीश पवार, नितीन जैन, दीपक पवार, मुराद पटेल, गौतम आरख, रामलाल मिस्तरी आदींनी सहभाग घेत परिश्रम घेतले.

उपक्रमातून आत्मिक समाधान…
दोन्ही लाटेत वर्धमान धाडीवाल मित्र मंडळाने चाळीसगाव शहरातील कोरोना रुग्णांसह होम क्वॉरंटाईन असलेल्या रुग्णांसाठी ही सेवा दिली. या काळात चाळीसगाव शहरात नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, मनमाड, मालेगाव या ठिकाणाहून रुग्ण शासकीय आणि खासगी रुग्णालयात दाखल होत असत. त्यावेळी भीतीमुळे त्यांचे नातेवाईकही जवळ येत नसत. त्यामुळे आम्ही वॉटसऍप नंबर चाळीसगाव तालुक्यातील बहुतांश ग्रुपला व्हायरल करून आमची संकल्पना लोकांपर्यंत मांडली. त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 10 ते 12 कार्यकर्त्यांनी यासाठी परिश्रम घेतले. या उपक्रमातून रुग्ण सेवेची संधी मिळाल्याने आत्मिक समाधान लाभले.
– वर्धमान धाडीवाल, धाडीवाल मित्र मंडळ, उपक्रम प्रमुख, चाळीसगाव