जळगाव : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून ५० टक्यांपेक्षा जास्त नफा मिळेल, असे आमिष दाखवित सायबर ठगांनी जळगाव येथील ३३ वर्षीय तरुणाला ४३ लाख २२ हजार ६५३ रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी तरुणाच्या तक्रारीनुसार बुधवार, ३० रोजी सायबर पोलीस ठाण्यात महिला ठगासह दोघांवर फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला.
तक्रारदार हे शहरातील निवृत्तीनगरात वास्तव्यास असून नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ३ सप्टेंबर ते २८ ऑक्टोबर २०२४ दरम्यान सायबर ठगांनी तरुणाशी व्हाटसॲपने मोबाईलवर संपर्क साधला. नं. १२६ टीपीजी स्ट्रेटीजीक इनव्हेस्टमेंट गृप या व्हाटसअॅप गृपची ॲडमीन अनन्या वर्मा हिने या गृपमध्ये तरुणाचा मोबाईल क्रमांक जॉइंट केला. त्यानंतर त्याला एक लिंक पाठविली. तसेच टीपीजी कॅप हे ॲप डाऊनलोड करण्याचा सल्ला दिला. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास ५० टक्केपेक्षा जास्त नफा मिळेल, असे आमिष दाखविले.
सायबर ठग तथा या गृपचा सदस्य पुनीत भाटीया याने तरुणाच्या व्हाटसॲपव्दारे संपर्क करून शिव टेएक्सचेम लि. हुंदाई, अशा आयपीओ संदर्भात माहिती दिली. हे आयपीओ खरेदी केल्यास दुपटीपेक्षा जास्त नफा मिळेल, अशी खोटी थाप दिली. ही कंपनी सेबीकडील नोंदणीकृत असून त्याचा नोंदणी क्रमांक बनावट सांगत तक्रारदार तरुणाला जाळ्यात ओढले. त्यानंतर तक्रारदार यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यातून ऑनलाइन नेटबँकिंगव्दारे सुमारे ४३,२२,६५३ रुपये घेतले. त्यानंतर तक्रारदाराला ना नफा ना मुद्दल न देता फसवणूक केली. याप्रकरणी सायबर ठगाविरोधात गुन्हा दाखल झाला. तपास पो. नि. नीलेश गायकवाड हे करीत आहेत.