तळोदा : तालुक्यात हिंस्र प्राण्यांचा हैदोस वाढला आहे. अश्यातच परिसरातील गणेश बुधावल येथे बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे . या हल्यात एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. ललिताबाई अशोक पाडवी (४५) असं मृत महिलेचं नाव आहे. परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दि १५ रोजी सकाळी ९ वाजे दरम्यान तळोदा तालुक्यातील गणेश बुधावल शिवारात ललिताबाई अशोक पाडवी (४५) व त्यांचे पती अशोक पाडवी हे आपल्या उसाच्या शेतात पाणी भरत होते. त्यांच्या शेताला लागून मक्याचे शेत आहे. उसाच्या शेतात पाणी भरत असताना ललिताबाई या मक्याच्या शेतालगत अवघ्या आठ ते दहा फुटाच्या अंतरावर होत्या. त्याचवेळी मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. घडलेला प्रकार पती अशोक पाडावी यांच्या लक्षात येताच त्यांनी ओरडा केल्याने शेतात काम करत असणाऱ्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. शेतकऱ्यांनी बिबट्याचा पाठलाग केल्यामुळे ललिताबाई यांना बिबट्याने मक्याच्या शेतात सोडून पळ काढला. मात्र ललिताबाई यांच्या गळ्याला जबड्यात पकडल्याने त्या गंभीर जखमी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला होता.
त्यानंतर यांना तात्काळ गणेश बुधावल गावात आणले गेले मात्र तोपर्यंत त्यांच्या मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. मयत ललिताबाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयातील शवगृहात आणण्यात आला आहे. या घटनेमुळे गणेश बुधावल,भवर,धवळीविहीर दलेलपूर आदी भागात परत बिबट्या मुक्त सचार मुळे भितीची वातावरण तयार झाले आहे.
या घटनेमुळे गावकऱ्यांनी वनविभागावर संताप व्यक्त केला आहे. ग्रामस्थांना बिबट्या मुक्त संचार करताना आढळून येत होता. त्यासंदर्भात तळोदा वनविभागास वारंवार कळविले होते. बिबट्या जेरबंद करणेबाबत देखील वनविभागाला अर्ज करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. परंतु वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे आज पुन्हा एका महिलेचा जीव गेला आहे.
तळोद्यात बिबट्याच्या हल्ल्यात 45 वर्षीय महिला ठार, परिसरात भीतीचे वातावरण
by team
Published On: March 15, 2025 3:33 pm

---Advertisement---