जिल्ह्यातील 450 अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारतीची प्रतिक्षा !

तरुण भारत लाईव्ह ।१० जानेवारी २०२३।  जिल्ह्यातील ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अंगणवाडी महत्वाची भूमिका पार पाडत असतात. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुरूवात याच अंगणवाड्यातून होते. जिल्ह्यात 3 हजार 642 एकूण अंगणवाड्या आहेत. त्यातील 35 अंगणवाड्या आजस्थितीत भाड्याच्या इमारतीत भरत आहेत. त्यामुळे या अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारतीची प्रतिक्षा आजही कायम आहे. जिल्ह्यात जवळपास 450 अंगणवाड्यांना इमारती नाहीत. बहुतांश ठिकाणी शाळेच्या आवारात किंवा शाळेच्या ठिकाणी य अंगणवाह्या भरतात.

43 लाभार्थ्याचे प्रस्ताव आजही प्रलंबित…
माझी कन्या भाग्यश्री योजनेचे 43 प्रस्ताव गेल्या तीन वर्षांपासून कागदोपत्री पुर्ततेत अडकले आहेत. तीन वर्षांत केवळ 62 लाभार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाने लाभ दिला आहे. शासनाकडून या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असतांनाही लाभार्थ्यांना या योजनेच्या लाभापासून वर्षांनुवर्षांपासून वंचित ठेवले जात आहे. एक किवा दोन मुलींवर शस्त्र्रकीया करणार्‍या पालकांच्या पाल्यासाठी ही योजना शासनाने सुरू केली आहे. मात्र शासनाकडून निधी उपलब्ध असतांनाही जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागाच्या उदासीनतेमुळे या योजनेचा लाभासाठी लाभार्थ्यांची अजूनही प्रतिक्षा संपलेली नाही. 43 लाभार्थ्यांचे प्रस्ताव आजही कागदपत्रांचे कारण देत प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्ह्यात स्वत:च्या इमारती असलेल्या अंगणवाड्या 3 हजार 242 आहेत. जिल्हाभरात एकूण नव्याने 289 अंगणवाड्याच्या बांधकामांना मंजूरी मिळाली आहे. त्यापैकी 263 अंगणवाड्याचे बांधकाम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्हाभरातील अंगणवाड्यामध्ये 81 पर्यवेक्षिका काम करीत आहेत. त्यामाध्यमातून जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्राचे कामकाज चालते. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना आरोग्य विभागाची सेवेचेही काही कामकाज करावे लागतात.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत बाला उपक्रमांच्या माध्यमातून नव्याने जिल्ह्यातील आवश्यक त्याठिकाणी अंगणवाड्यांच्या बांधकामास मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे या अंगणवाड्यांना लवकरच स्वत:ची इमारती मिळणार आहेत. जिल्ह्यात सध्या स्वत:ची इमारत नसलेल्या ठिकाणी समाजमंदीर, शाळा याठिकाणी अंगणवाडी भरते. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते. त्याअनुषंगाने अंगणवाडी इमारतीच्या बांधकामांसाठी बाला अंतर्गत स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे.