४६ वर्षांनंतर उघडले जगन्नाथ मंदिराचे रत्न भांडार

ओडिशातील पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराचा प्रतिष्ठित खजिना ‘रत्न भांडार’ रविवारी उघडला आहे. राज्य सरकारने हा खजिना तब्बल ४६ वर्षांनंतर दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या यादीसाठी खुला केला आहे. यापूर्वी तो १९७८ मध्ये उघडण्यात आला होता.

चार धामांपैकी एक असलेले जगन्नाथ मंदिर बाराव्या शतकात बांधले गेले. या मंदिरात रत्नांचे भांडार आहे. जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा या तिन्ही देवतांचे दागिने या रत्नांच्या भांडारात ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. अनेक राजे आणि भक्तांनी दागिने अर्पण केले होते. आजपर्यंत त्याचे मूल्यमापन झालेले नाही.

श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने उच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, रत्न भांडारमध्ये तीन खोल्या आहेत. आतील खोलीत जवळपास ५१ किलो सोने आणि १३४ किलो चांदी आहे. हे दागिने कधीही वापरले गेले नाहीत. बाहेरील खोलीत ९५ किलो सोने आणि १९ किलो चांदी आहे. हे सणासुदीला काढले जातात. तिसऱ्या खोलीत तीन किलो सोने आणि ३० किलो चांदी आहे. हे दागिने दैनंदिन विधींसाठी वापरले जातात.

आतापर्यंत किती वेळा उघडले?
मंदिर व्यवस्थापन समितीचे प्रमुख अरविंद पाधी यांनी सांगितले की, यापूर्वी रत्न भंडार १९०५, १९२६ आणि १९७८ मध्ये उघडण्यात आले होते आणि मौल्यवान वस्तूंची यादी तयार करण्यात आली होती. रत्न भांडार शेवटचे १४ जुलै १९८५ रोजी उघडण्यात आले त्यावेळी ती दुरुस्त करून बंद करण्यात आली होती. यानंतर रत्न भांडार कधीच उघडले नाही आणि त्याची चावीही गायब आहे.