जळगाव : बंद घर, दुचाकी चोरीच्या घटना शहरात नित्याच्यात झाल्या आहेत. आता आणि चैन स्नॅचिंग चोरट्यांनी रामानंदनगर हद्दीत सोमवारी एका महिलेच्या गळ्यातून दागिने लांबविले. यामुळे महिलांना रस्त्याने, कॉलनीत पायी चालताना खबरदारी घ्यावी लागणार आहे.दोन चोरटे दुचाकी घेवून महिलेजवळ आले. तिच्या गळ्यातील चैनसह मंगलपोत जबरीने हिसकावून ओढली.
चैन आणि मंगलपोत असे ७४ हजार किमतीचे दागिने लुटत चोरटे पसार झाले. सोमवार, २९ रोजी रात्री ८.१० वाजेच्या सुमारास हनुमान कॉलनीत ही घटना घडली. रुची लक्ष्मीनिवास काबरा (४५) या महिला अभियंता कॉलनी गजानन पार्क येथे राहतात. त्या हनुमान कॉलनीतून येत असताना दुचाकीवरुन दोन चोरटे आले. महिलेच्या गळ्यातील ४.५ ग्रॅम वजनाची सुमारे २६ हजार किमतीची चैन, ८ ग्रॅम वजनाचे ४८ हजार किमतीची सोन्याचे मणी व मंगळसूत्राची एका बाजुची साखळी अशी पोत हिसकावून ओढली. महिलेने प्रतिकार केला, मात्र तरबेज चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन्ही दागिने लुटले.
महिलेने आरडाओरड केली, तोवर चोरटे दुचाकीने वेगात फरार झाले. तक्रारीवरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास सपोनि रोहिदास गभाले करत आहेत. घटना कळताच पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, सपोनि विठ्ठल पाटील यांसह कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्हीचा शोध घेऊन फुटेज मिळविण्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाला वेग दिला.