जळगाव : जळगावकरांची शहर बससेवा नोव्हेंबर २०१४ पासून बंद आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानंतर ओमसाई सिटी सर्व्हिसेसने शहर बससेवा दिली होती. परंतु, करारनाम्यातील अटी-शर्तींची पूर्तता न केल्याने आणि थांब्यासाठी जागा न दिल्यामुळे शहर बससेवा बंद झाली. आता जळगावकरांच्या सेवेत ५० ई-बस धावणार आहेत.
पीएम ई-बससेवा योजनेअंतर्गत जळगावला शहर ई-बस सेवा सुरु करण्यात येणार आहे. यासाठी मेहरूण येथील जुन्या टी. बी. हॉस्पिटल जागेत चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून शहरात ई बससेवा सुरु करण्यात येत आहे.
महापालिकेतर्फे त्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांनी याची संपूर्ण प्रक्रिया सुरु केली आहे. बससेवेसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी प्राथमिक स्वरूपात जुने बसस्थानक व ख्वाजा मियाँ चौकाजवळील उठविलेल्या झोपडपट्टीची जागा सुचविण्यात आली होती. मात्र त्या जागेसाठी नागरिकांनी विरोध केल्यामुळे आता महापलिकडून दुसऱ्या जागेचा शोध घेतला जात आहे.
सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांनी टीबी हॉस्पिटलच्या जागेची पाहणी करण्याच्या सूचना आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांनी केल्या आहे. जळगाव शहरात ई-बसेस सुरु होणार आहे. मनपा प्रशासनाकडून मोठ्या, माध्यम व मिनी अशा तीन प्रकारच्या बसेस मिळाल्यास मोठ्या बसेस ग्रामीण भागापर्यंत जाणार आहेत. मध्यम बसेस शहरात मुख्य रस्त्यावर, तर मिनी बसेस जवळजवळ थांब्यावर सोडण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली आहे.