वर्धा : जिल्ह्यातील आशा गटप्रर्वतकांना संगणकीय कामकाज करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे त्यांनी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडे टॅब उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्री भोयर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 54 टॅब खरेदीस मंजुरी दिली असून, त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे.
कामकाजात होणाऱ्या अडचणींवर तोडगा
जिल्ह्यातील आशा गटप्रर्वतक सुषमा गुरनुले, चारुशीला गोडे, विभा आगलावे, अरुणा खैरकार, संगिता निमजे, अर्चना मुन, अश्विनी बोराडे, संगिता भलमे, मिनाक्षी गायकवाड, अल्का पुरी, दिपाली पुरी, दिपाली तारणेकर,नंदा महाकाळकर व अन्य सदस्यांनी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांना निवेदन सादर करून त्यांच्या अडचणी मांडल्या होत्या.
सध्या 25 आशा सेविकांमागे 1 आशा गटप्रर्वतक कार्यरत आहे. या गटप्रर्वतकांची जिल्ह्यात एकूण 54 संख्या आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत शहरी आणि ग्रामीण भागात आशा गटप्रर्वतक कार्यरत आहेत. आशा सेविका घरोघरी जाऊन गर्भवती महिलांची नोंदणी, लहान मुलांचे लसीकरण, कुटुंब नियोजन, कुष्ठरोग आणि इतर आरोग्य विषयक माहिती संकलित करून गटप्रर्वतकांकडे सुपूर्त करतात.
हेही वाचा : Crime News: जालन्याची मोनिका ठरली ‘लव्ह जिहाद’ची बळी; शेतात नेत इरफानने केले असे की, अंगावर येईल काटा
संगणकीय सुविधा नसल्यामुळे वाढलेली समस्या
शासनाच्या पोर्टलवर आरोग्यविषयक माहिती भरावी लागते. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आशा गटप्रर्वतकांसाठी स्वतंत्र संगणक उपलब्ध नसल्यामुळे त्यांना माहिती भरताना अनेक अडचणी येत होत्या. संगणक नसल्याने नेट कॅफेमध्ये जाऊन मर्यादित वेळेत माहिती भरावी लागत होती. यामुळे अनेकदा कामावर परिणाम होत असे.
12.95 लाखांचा निधी मंजूर
आशा गटप्रर्वतकांच्या या अडचणींवर विचार करून पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 54 टॅब खरेदीस मंजुरी दिली. यासाठी 12 लाख 95 हजार 460 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
हेही वाचा : धक्कादायक ! चार महिन्यांपूर्वीच मिळाली नोकरी अन् अपघातात संपले नव्या भविष्याची स्वप्ने, १ ९ वर्षीय पोस्टमास्तरचा दुर्दैवी मृत्यू
आरोग्य सेवा अधिक प्रभावी होणार
टॅब उपलब्ध झाल्यामुळे आशा गटप्रर्वतकांना आरोग्यविषयक माहिती तातडीने आणि सोयीस्कर पद्धतीने शासनाच्या पोर्टलवर भरता येणार आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाज वेगाने आणि अधिक प्रभावीपणे पार पडण्यास मदत होईल.
पालकमंत्र्यांच्या या निर्णयाचे जिल्ह्यातील आशा गटप्रर्वतक आणि आरोग्य कर्मचारी यांनी स्वागत केले असून, लवकरच टॅबचे वाटप करण्यात येणार आहे.