जिल्ह्यातून ५५ गुन्हेगार तडीपार : पोलीस अधीक्षकांची माहिती

जळगाव : लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याबरोबरच मतदान प्रक्रिया निर्भयतेच्या वातावरणात पार पाडण्याच्यासाठी पोलीस दलाने जिल्ह्यात प्रभावी कारवाई केल्या. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ५५ जणांना जिल्ह्यातून तडीपार केले. यात तीन टोळ्यांचाही समावेश आहे. ९ जणांना एमपीडीए अंतर्गत स्थानबध्दता तर एकाला मोक्का लावण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.

कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्याबरोबरच निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनी जिल्ह्यात विविध कलमनिहाय प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारत संशयितांवर कारवाई केली. यात सीआरपीसी १०७ ४०४६ लोकांचे बॉन्ड लिहून घेतले. कलम १०९ नुसार ५ जणांवर, कलम १०९ नुसार १३०, कलम ११० नुसार ५४० जणांवर, कलम ९३ अन्वये ३२४, कलम ५५ अन्वये
३, कलम ५६ अन्वये ४३, कलम ५७ नुसार ४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. सीआरपीसी १४९ अन्वये ३ हजार २५० जणांना पोलिसांना नोटीसा बजावल्या. चाळीसगाव येथे एका गुन्ह्यातील गुन्हेगाराला मोक्का लावला. ८ हजार ८३० लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई तर २ हजार ७६४ जणांना नॉनबेलेबल वॉरंट बजावले. दारुबंदीच्या ७३८ केसेस केल्या. शस्त्रप्रकरणी पाच केसेस केल्या. गांजाच्या चार केस करुन ११४ किलो गांजा किमत १० लाख ७७ हजाराचा जप्त केला. गुटखाच्या १४ केसेस करुन १ कोटी ७९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. एमडी कारवाईच्या दोन केसेस करुन ८२ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला. एकूण जिल्ह्याभरात ४ कोटी २ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यस्थेसाठी बीएसआय, सीएफएस तसेच कर्नाटक, आध्रप्रदेश, केरळ या राज्यातून कंपनी दाखल झाल्या आहेत. मतदानाच्या दिवशी तब्बल २ हजार ३०० कर्मचारी तसेच ३ हजार होमगार्ड कर्तव्यावर असणार आहेत. बंदोबस्तासाठी आणखी कंपनी दाखल होतील, असेही पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.