धुळे : गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे शिरपूर तालुक्यातील गोरखनाथ पाडा हिसाळे येथे बुधवार, 18 रोजी दुपारी अवैधरीत्या फुलवण्यात आलेल्या गांजा शेतीवर कारवाईचा बुलडोझर फिरवल्याने अवैधरीत्या गांजा शेती करणाऱ्यांच्या गोटात खळबळ उडाली. पथकाने शेतातील तीन ते सहा फुटांची गांज्याची 56 लाख आठ हजार 750 रुपये किंमतीची एक हजार 240 झाडे जप्त केली. संशयित देवसिंग वांगऱ्या पावरा (हिसाळे, ता.शिरपूर) हा पसार झाला असून त्याच्याविरोधात थाळनेर पोलिसात महेंद्र सपकाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, रवींद्र माळी, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, हर्षल चौधरी, किशोर पाटील, चालक राजू गीते आदींच्या पथकाने केली.