तरुणभारत लाईव्ह न्युज : शहरातील काही ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांना नुकताच प्रारंभ झाला आहे, तर यातील अनेक रस्त्यांची कामे अजूनही थांबलेलीच आहे. याचा त्रास जळगावकरांना भोगावा लागत आहे. पण यातील मुख्य कारण म्हणजे मक्तेदार कामच करत नसल्याचे महानगरपालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
शहरात अत्यंत दुरवस्था झालेल्या रस्त्यांचे रूप काही दिवसातच पालटणार आहे. यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे राहिलेल्या ६२ कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांना येत्या महासभेत मंजुरी देण्यात येणार आहे. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणार आहे, तर मंजुरीनंतरची सर्व सूत्रदेखील सा. बां. विभागाकडे असतील.
यापूर्वीच महानगरपालिकेमार्फत नागरी दलितेत्तर सुधारणा योजनेंतर्गत ६ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहे त्यात मुख्य रस्ते नसून कॉलनींमध्ये लहान रस्त्यांचा समावेश आहे. येत्या आर्थिक वर्षात महानगरपालिकेने शहरातील ठिकठिकाणच्या ६२ कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. या रस्त्यांच्या कामांना २१ डिसेंबरला होणार्या महासभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळताच कामे सुरू होणार असल्याची माहिती बांधकाम विभागातून मिळाली आहे. यातील कोणत्याही रस्त्यांच्या कामाचा निधी हा परत गेला नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
मक्तेदार होणार ब्लॅक लिस्ट
शहरातील रस्त्यांच्या कामांना उशीर होत आहे, ही चर्चा सर्वत्र असतानाच हा उशीर अधिकारी व पदाधिकार्यांमुळे होत नसून, मक्तेदारांना कार्यादेश देऊन देखील ते स्वतः च्या मनाप्रमाणे काम करीत आहे. यामुळे नागरिकांचा संताप अधिकारी व पदाधिकार्यांवर ओढवला जात आहे. महासभा झाल्यावर जे मक्तेदार आदेश देऊनदेखील कामे करीत नाही किंवा कामे आपल्या मनाप्रमाणे करतात त्यांच्याबाबत चर्चा करून त्यांच्यावर कारवाई करत त्यांना ‘ब्लॅक लिस्ट’ करण्यात येणार आहे.
शहरातील रस्त्यांचा निधी परत गेला अशी चर्चा आहे. पण हा निधी परत जात नाही. जी कामे बाकी असतात त्या कामांचा निधी जिल्हाधिकार्यांकडे अखर्चित निधी म्हणून जमा असतो. तो निधी त्या कामासाठी वापरला जातो.
-चंद्रकांत सोनगिरे, प्र. शहर अभियंता, मनपा, जळगाव