---Advertisement---
तिबेटच्या डोंगराळ प्रदेशात मंगळवारी सकाळी एका तासाच्या आत सलग सहा भूकंपांचे धक्के बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.1 मोजली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू तिबेटमधील शिगात्से शहराजवळ होता. या भूकंपामुळे किमान 53 जणांचा मृत्यू झाला असून 38 जण जखमी झाले आहेत.
---Advertisement---

तिबेटमध्ये मोठे नुकसान
माहितीनुसार, तिबेटमधील शिगात्से शहरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या असून, मागील पाच वर्षांतील हा सर्वाधिक तीव्र भूकंप ठरला आहे. शिगात्से शहराच्या 200 किमी परिसरात यापूर्वी 29 लहान-मोठे भूकंप झाले असले तरी, 7.1 रिश्टर स्केलच्या या भूकंपामुळे प्रचंड हानी झाली आहे.
भारताही जाणवले धक्के
मंगळवारी सकाळी 6.52 वाजता भूकंपाचे धक्के नेपाळच्या काठमांडू, धाडिंग, सिंधुपालचौक, कावरे, मकवानपूर आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये जाणवले. भारतातील उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्किमसह अनेक पूर्वोत्तर राज्यांमध्येही भूकंपाचे झटके बसले. भूकंपानंतर नागरिक घराबाहेर पडले. मात्र, भारतातून अद्याप कोणत्याही जीवितहानीची नोंद झालेली नाही.
भूकंप कसे होतात?
शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वी सात टेक्टोनिक प्लेट्सपासून बनलेली असून, या प्लेट्स सतत हालचाल करत असतात. त्यांच्या घर्षणामुळे भूकंप होतो. भूकंपाची तीव्रता जास्त असल्यास मोठा विध्वंस होण्याचा धोका असतो.
नागरिकांचा अनुभव
काठमांडूतील मीरा अधिकारी यांनी सांगितले की, “मी झोपले होते. अचानक पलंग हादरू लागला. मला वाटले की मुलगा अंथरुण हलवत आहे. पण खिडकीच्या आवाजामुळे भूकंप झाल्याचे समजले. मी मुलाला घेऊन त्वरित घराबाहेर पळाले.”
तिबेटमधील स्थिती गंभीर
सध्या तिबेटमध्ये मदतकार्य सुरू असून, ढिगाऱ्याखालून लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिगात्से आणि आसपासच्या भागातील परिस्थिती चिंताजनक आहे. प्रशासनाकडून पुनर्वसनासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत.