Mahakumbh 2025: रस्ते बंद, पण भक्तीची वाट मोकळी! ७ भाविकांनी बोट तयार करून गाठले प्रयागराज, पहा VIDEO

प्रयागराज: महाकुंभ 2025 मध्ये संगमस्नानासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी प्रयागराजकडे जाणारे सर्व प्रमुख मार्ग पूर्णपणे जाम होते. लाखो भाविकांच्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. परंतु सात भाविकांनी जलमार्गाचा वापर करून 275 किमीचा भन्नाट प्रवास करत प्रयागराज गाठले. हा प्रवास केवळ वेगळाच नव्हता, तर तो त्यांच्या चिकाटीचे आणि श्रद्धेचे प्रतीकही ठरला. या भाविकांच्या प्रेरणादायी प्रवासाने महाकुंभात जाणाऱ्या इतर भक्तांसाठी एक वेगळा मार्ग खुला केला आहे.

बिहार आणि उत्तर प्रदेशातील सात भाविकांनी वाहतूक कोंडीचा सामना करण्यासाठी अनोखा मार्ग अवलंबला. या भाविकांनी रस्त्यांवरील प्रचंड गर्दी पाहून जलमार्गाने प्रयागराज गाठण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वतःच तयार केलेल्या मोटरबोटने बिहारच्या बक्सर येथून तब्बल 275 किमीचा जलप्रवास करत प्रयागराज गाठले आणि संगमस्नान करण्याचा आपला संकल्प पूर्ण केला.

हेही वाचा:  लग्नाचा आनंद गोंधळात बदलला! थाटामाटात वरात निघाली अन् वधूचा पहिला नवरा मंडपात आला आणि सगळं…

या सात भाविकांनी बोटीवर दोन इंजिन बसवले होते. प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यांनी पेट्रोल, गॅस सिलिंडर, चूल, अन्नधान्य, पाणी आणि झोपण्यासाठी गाद्या बरोबर घेतल्या होत्या. बोटीवरून दोन जण प्रवास चालवायचे, तर उर्वरित पाच जण विश्रांती घेत होते. अशा पद्धतीने त्यांनी आपला प्रवास सुरळीत पार पाडला.

या सात भाविकांनी 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता बक्सर येथून आपला प्रवास सुरू केला. त्यांनी गाझीपुर, वाराणसी, जौनपूर मार्गे प्रयागराज गाठले. तब्बल 84 तासांच्या अविश्रांत प्रवासानंतर ते 12 फेब्रुवारीच्या रात्री 1 वाजता प्रयागराज येथे पोहोचले. मात्र संगमच्या 5 किमी आधी त्यांची बोट थांबवावी लागली, कारण पुढे एक पूल असल्यामुळे मोटरबोट पुढे नेता येत नव्हती. त्यामुळे त्यांनी बोट किनाऱ्यावर लावली आणि उरलेले अंतर पायी चालत पूर्ण केले.

13 फेब्रुवारीच्या पहाटे या भाविकांनी गंगामैयेत स्नान करून पूजाअर्चा केली आणि आपले महाकुंभाचे ध्येय पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी लगेचच परतीचा प्रवास सुरू केला आणि 14 फेब्रुवारीच्या रात्री 1 वाजेपर्यंत बक्सरमध्ये सुखरूप परतले. या प्रवासासाठी त्यांना एकूण 20 हजार रुपये खर्च आला. यामध्ये बोटीच्या इंधनाचा खर्चही समाविष्ट आहे. दर 100 किमी अंतरावर त्यांना पेट्रोल भरावे लागत होते.

या सात भाविकांचा अनोखा जलप्रवास सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. लोकांनी त्यांच्या हुशारीचे आणि कल्पकतेचे कौतुक केले आहे. वाहतूक कोंडीत अडकण्याऐवजी जलमार्गाचा पर्याय निवडण्याच्या त्यांच्या निर्णयाने अनेकांना प्रेरणा दिली आहे.