तरुण भारत लाईव्ह । भटेश्वर वाणी । जळगाव शहरात विकास कामांची वानवा आहे. ना धड रस्ते, ना सांडपाणी व्यवस्थापन. प्रभागांमधील या विषयांना घेऊन नगरसेवकांनी पेटून उठायला हवे पण अनेक जण सभागृहात ‘मौनीबाबा’ची भूमिका बजावतात. यातून समोर आलेल्या माहितीनुसार गत 9 महिन्यात नगरसेवकांनी शहरातील समस्या व अन्य विषयांवर अवघे 7 प्रश्न लेखी स्वरूपात मांडले आहेत.
शहरातील विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी लोकशाही पद्धतीने नगरसेवकांची निवड नागरिक करित असतात. पहिला नगरसेवक काम करत नव्हता, समस्या सोडवत नव्हता, विकास कामांकडे दुर्लक्ष करत होता म्हणून दुसर्याला निवडून दिले जाते. तोदेखील तसाच अशी परिस्थिती वॉर्डांमध्ये असते. यातूनच लोकशाही पद्धतीने परिवर्तनाच्या माध्यमातून बदललेला नगरसेवक नागरिक निवडत असतात. आणि त्यांचे लक्ष एकाच गोष्टीकडे लागलेले असते की आमचा नगरसेवक आमच्या समस्या सोडवून प्रभागाचा विकास करेल. पण कामे होत नाही.
जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील चारही बाजूंच्या रस्त्यांची अक्षरशः चाळणी झालेली आहे. सध्या केवळ एक-दोन रस्त्यांची कामे सुरू आहेत. शहरातील 90 टक्के रस्त्यांवरून चालणेदेखील जिकरीचे झाले आहे. याबाबत नागरिकांच्या अत्यंत संतापजनक भावना आहे. याचा परिणाम महानगरपालिकेच्या 2023 मध्ये होणार्या पंचवार्षिक निवडणुकीत होणे स्वाभाविकच आहे.
महापालिका सभांमधून प्रश्न मांडण्यासाठी वेळ दिला जात असतो. प्रश्नोत्तरांचा तास हा नगरसेवकांसाठी हक्काचा असतो. यासाठी गरजेचं आहे ते प्रश्न लेखी स्वरूपात मांडणे. पण तसे होतांना दिसत नाही. कारण एप्रिल 2022 ते डिसेंबर 2023 दरम्यान महानगरपालिकेच्या 7 महासभा झाल्या आणि विविध गोष्टींमुळे गाजल्याही. यात अनेक नगरसेवकांनी या ना त्या कारणांनी सभा दणाणून सोडल्या, सभा तहकूब करण्यापर्यंत गोंधळ झाला. पण जेव्हा प्रभागाचे प्रश्न लेखी स्वरूपात मांडायचे असते, तेव्हाच आपला नगरसेवक किती मागे आहे.
केवळ सहा जणांनी मांडले प्रश्न
जळगाव महानगपालिकेत एकूण 75 नगरसेवक आहेत. स्वीकृत 4 असे एकूण 79 नगरसेवकांच्या माध्यमातून या शहराचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी या प्रत्येकावर आहे. पण गेल्या 9 महिन्यात झालेल्या 7 महासभांमध्ये लेखी स्वरूपात प्रश्न मांडणारे अवघे सहाच नगरसेवक आहे. प्रत्येक नगरसेवकाने कलम 44 अन्वये आपल्या प्रभागाच्या समस्यांवर लेखी स्वरूपात प्रश्न मांडणे गरजेचे असतांना 79 नागरसेवकांमधून फक्त 6 नगरसेवकांनी 9 लेखी प्रश्न मांडल्याचे मनपा दप्तरी नोंद आहे. यात नगरसेवक चेतन सनकत 1 प्रश्न, रियाज बागवान 1 प्रश्न, सदाशिवराव ढेकळे 1 प्रश्न, कैलास सोनवणे 1 प्रश्न, राजेंद्र पाटील 1 प्रश्न तर अॅड. दिलीप पोकळे यांनी 4 प्रश्न डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या महासभेदरम्यान प्रश्नोत्तराच्या काळात मांडल्याची नोंद आहे. हक्काच्या वेळात प्रश्न न मांडता अनेक जण आकांडतांडव करत असल्याचे या आकडेवारीवरून लक्षात येते.
शहरात असंख्य समस्या
रस्ते, गटारी, पथदिवे, कचरा, शहरात उडणारी धूळ, नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होणारे मणक्यांचे आजार यास नेमकं जवाबदार कोण ? हे शोधण्यासाठी आता नागरिक रस्त्यावर उतरणेच बाकी आहे. गेल्या दोन वर्षांपासून अशा अनेक समस्यांना सामोरे जात गुपचूप सहन करणार्या जळगावकरांची सहनशीलता आता संपत चालली आहे.