काँग्रेसची ७ मतं गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यासोबत नाहीत ;संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई : काँग्रेसची ७ मतं दोन वर्षांपासून त्यांच्यासोबत नाहीत, असा गंभीर आरोप उबाठा गटाच्या संजय राऊत यांनी केला आहेत. शुक्रवारी पार पडलेल्या विधानपरिषद निवडणूकीत काँग्रेसची मतं फुटल्याचा दावा करण्यात येत आहे. यावर आता संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत म्हणाले की, “काँग्रेसची ७ मतं फुटली हे काही लपून राहिलेलं नाही. स्वत: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी हे मान्य केलं आहे. त्यामुळे ७ मतं फुटली याच आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही. ते आधीच फुटलेले आहेत. मागच्या विधानपरिषद निवडणूकीत चंद्रकांत हंडोरेंचा पराभव करणारे हेच ७ लोकं आहेत. याच ७ लोकांनी बेईमानी करून आपल्याच उमेदवाराला पाडलं होतं. त्यामुळे आम्हाला फार मोठा धक्का बसला असं म्हणण्याची गरज नाही.”

“शिवसेनेचं एकही मत फुटलं नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाची मतंही जयंत पाटील यांना मिळाली आहेत. काँग्रेसची ७ मतं गेल्या दोन वर्षांपासून काँग्रेससोबत नाही. ती कागदावर असून नावांसह पुढे आलेली आहेत,” असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.