जळगाव : जिल्ह्यातील हतूनर, गिरणा आणि वाघूर या मोठ्या, १४ मध्यम आणि ०६ लघु प्रकल्पात सरासरी ३९.३७ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. हतनूर आणि गिरणा प्रकल्पातून सिंचनासह पेयजलाचे तीन आवर्तन देण्यात आले आहेत.
तसेच गिरणा प्रकल्पातून चार आवर्तन पेयजलाचे शिल्लक आहेत. यापैकी फक्त गिरणा प्रकल्पावर अवलंबून असलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी चौथे आवर्तन मागणीनुसार येत्या काही दिवसात लवकरच सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तापमानाचा पारा कमालीचा वाढला असल्याने जलसाठ्यात बाष्पीभवनामुळे घट होत आहे.
गिरणा प्रकल्पातून आतापर्यंत सिंचनासह तीन आवर्तने देण्यात आली आहेत. सद्यस्थितीत गिरणा प्रकल्पात २८.९० टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक असून मागणीनुसार पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे गिरणा पाटबंधारे प्रशासन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
जळगावकरांना दिलासा
वाघूर प्रकल्पावरून जळगाव शहरास किमान दोन दिवसांआड निर्धारीत वेळेनुसार पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सद्यस्थितीत वाघूर प्रकल्पात ७४.९१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. पाणीसाठा पाहता शहरात कोणत्याही परिसरात पाणी कपात करण्यात येणार नसल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.