74 जणांना अनुकंपाची लॉटरी

 जळगाव : जिल्हा परिषदेच्या सानेगुरुजी सभागृहात शुक्रवारी अनुकंपाधारकांची  समुपदेशनाद्वारे 74 जणांना पदस्थापना  देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनुकंपाधारकांच्या कुटंबातील 74 जणांना नोकरीची लॉटरी लागली आहे.  दरम्यान जि.प. सीईओ डॉ.पंकज आशिया यांच्या पुढाकाराने त्यांच्या कार्यकाळात सलग तिसर्‍यांदा अनुकंपाधारकांच्या कुटुंंबांना न्याय मिळाला आहे.

जि.प.च्या सामान्य प्रशासन विभागाकडून अनुकंपा भरतीसाठी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी 26 एप्रिल रोजी करण्यात आली होती. राज्य शासनाकडून सरळ सेवा पदभरतीची जाहिरात लवकरच येणार असल्याने त्यापूर्वी जि.प.प्रशासनाकडून शासन नियमानुसार अनुकंपाधारकांची भरती प्रक्रिया आज राबविण्यात आलेली होती. जि.प. सीईओ डॉ.पंकज आशिया, जि.प.सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे-पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबुलाल पाटील यांच्या उपस्थितीत अनुकंपाधारकांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यानुसार 74 जणांना समुपदेशनाद्वारे पदस्थापना देण्यात आलेली आहे.

त्यात विभागनिहाय कंत्राटी ग्रामपंचायत- 17, वरिष्ठ सहाय्यक- 2, लोखाधिकारी -1, कनिष्ठ लेखा-1, कनिष्ठ अभियंता -5, औषध निर्माता- 2, पशुधन पर्यवेक्षक-4 विस्तार कृषी अधिकारी -1, परिचर 41 असे एकूण 74 जणांची शुक्रवारी समुपदेशनाद्वारे पदस्थापना करण्यात आली आहे. यापुर्वी सीईओंच्या पुढाकाराने 267 अनुकंपाधारकांना नोकरी देण्यात आलेली होती. आता जि.प. सीईओ डॉ.पंकज आशिया यांच्या कार्यकाळात अनुकंपाधारकांना न्याय मिळाला आहे.