कासोदा, ता. एरंडोल : : येथून जवळच असलेल्या नांदखुर्द बुद्रूक येथील पोलीस पाटील भगवान कौतिक पाटील यांच्याविरोधात ग्राम पंचायत सदस्य विनायक नागो पगारेंसह दहा ते बारा ग्रामस्थांनी अंजनी नदीतून विनापरवानगी शेतात पाइप लाइन केल्याबाबत तक्रार केली होती. त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी एरंडोल यांनी तक्रारदार व सामनेवाले यांचे म्हणणे ऐकून पोलीस पाटील भगवान कौतिक पाटील यांना मासिक मानधनाच्या ७५ टक्के रकमेची शास्ती (दंड) करण्याचे आदेश पारित केले.
याबाबत अधिक वृत्त असे की, संबंधितांनी १३ एप्रिल ते ३० जून २०२३ या कालावधीत उपविभागीय की अधिकारी एरंडोल भाग एरंडोल चे यांच्या कार्यालयात तीन तक्रारी अर्ज दाखल केले. त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी एरंडोल यांनी तक्रारदार व सामनेवाले यांच्या खुलाशावरून भगवान कौतिक पाटील पोलीस पाटील नांदखुर्द बुद्रूक, तालुका एरंडोल यांना शास्तीचे आदेश केले. . त्याच्या प्रती त्यांनी जिल्हाधिकारी जळगाव (गृह शाखा), जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव, तहसीलदार एरंडोल, साहाय्यक पोलीस निरीक्षक कासोदा व तक्रारदार विनायक पगारे यांना देण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
याबाबत पगारे यांचे समाधान न झाल्याने सदर आदेशाविरुद्ध त्यांनी परत उपविभागीय अधिकारी एरंडोल यांच्याकडे तक्रार केली आहे.
त्यात भगवान पाटील हे गावात सक्रिय राजकारणात भाग घेतात, ग्रामपंचायत हद्दीतील विहिरीजवळून त्यांचे शेतात बेकायदेशीर पाइप लाइन करून अंजनी नदीतून ग्राम पंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीच्या हद्दीतूनच ते त्यांच्या वैयक्तिक क्षेत्रात पाण्याचा उपसा सिंचनासाठी करीत आहेत. याबाबत तक्रारदार यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. पगारे यांनी पोलीस पाटील यांना पदावरून हटवण्याची मागणीही केली आहे.