महापौरांकडून दिशाभूल ; शिंदे गटाचे निलेश पाटील यांचा पत्रपरिषदेत आरोप

जळगाव :  महापौर जनतेची दिशाभूल करीत असून पालकमंत्री निधी देत नसल्याचा त्यांचा आरोप चुकीचा असल्याची टीका शिंदे गटाचे निलेश पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. निधी देत नसल्याचे कारण पुढे करीत जनतेची सहानूभुती मिळावायची अन् पालकमंत्र्यांविषयी जनतेत रोष निर्माण करण्याचा प्रयत्न महापौर करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

भाजपा व शिंदे गटाची संयुक्त पत्रपरिषद अजिंठा विश्रामगृहात झाली. यावेळी नगरसेवक विशाल त्रिपाठी, राजेद्र घुगे पाटील, ऍड.दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, चेतन सनकत आदी उपस्थित होते. शिंदे गटात सहभागी होण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा महापौरांचा आरोप चुकीचा असून जर तसा कुणी त्यांना फोन केला असेल तर त्यांनी त्यासंदर्भात मोघम न बोलता उघड खुलासा करावा, असे आवाहनही निलेश पाटील यांनी केले. यापूर्वी महापौरांनीच माध्यमांमध्ये पालकमंत्र्यांनी निधी दिल्याचे सांगितले आहे.

त्यावेळच्या माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रीया वृत्त वाहिन्यांकडे आहेत, असे असतानाही महापौरांकडून पालकमंत्र्यांकडून निधी दिला जात नसल्याचे वारंवार बोलले जात आहे.

निधी खर्च करून घेता येत नाही. मनपाला भरघोस निधी दिला आहे. मात्र त्यांच्या चुका झाकण्यासाठी पालकमंत्र्यांना दोष देण्यात येत असल्याचे निलेश पाटील यांनी सांगितले.