विखारी वक्तव्य द्वादशीवारांना भोवले, म्हणून न्या. चपळगावकरांची वर्णी

मुंबई : अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड झाली. गेल्या महिन्यात संमेलनाच्या अध्यक्ष पदासाठी सुरेश द्वादशीवार यांच्या नावाची चर्चा सुरू होती, मात्र त्यांच्या काही वक्तव्यांवरून त्यांचे नाव मागे पडले. या निर्णयाचे अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. नरेंद्र पाठक यांनी स्वागत केले आहे.

या संदर्भातील प्रसिद्धीपत्रात त्यांनी म्हटले आहे की, सुरेश द्वादशीवार यांचे नाव निश्र्चित होण्याच्या टप्प्यावर असताना, नागपूर येथे एका कार्यक्रमात द्वादशीवार यांनी ब्राह्मण – अ ब्राह्मणवाद, जातीयता आणि सावरकर विरोध याविषयी अत्यंत विखारी वक्तव्य केले होते. आणि या वक्तव्याला अखिल भारतीय साहित्य परिषदेने कडाडून विरोध झाला. त्या विरोधाचा आणि निर्माण झालेल्या नैतिक दबावाचा परिणाम म्हणजे, न्या. नरेंद्र चपळगावकर यांची निवड आहे, याचा साहित्य परिषदेला आनंद, समाधान असल्याचे पाठक यांनी म्हटले आहे. अखिल भारतीय साहित्य परिषद न्यायमूर्ती चपळगावकर यांचे जाहीर अभिनंदन करत आहे. साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष हे निवृत्त न्यायमूर्ती असल्याने निश्र्चितपणे समाज जोडण्याची, राष्ट्रहित जपण्याची वैचारिक मांडणी करतील, तसेच साहित्य क्षेत्रातील गट तट, जातीयता, कंपूशाही अशा संकुचित विचार यातून साहित्य सृष्टी बाहेर काढतील, एक सकारात्मक दिशा दर्शन त्यांच्या भाषणातून करतील अशी अपेक्षा पाठक यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या अध्यक्षा डॉ. उषा तांबे आणि महामंडळाचे आभार मानले आहेत.