Raksha Khadse | प्रधानमंत्री फळपीक विमा योजना : लाभार्थी शेतकऱ्यांना होणार 327 कोटी रुपयाचा लाभ

जळगाव : पीकविमा धारक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फळ पिक विमा योजना २०२३-२४ अंतर्गत ३२७  कोटी रुपयांचा लाभ मिळणार असून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा लाभ जमा केला जाईल अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली.

पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पीक विमा योजना आंबिया बहार २०२३-२४ मधील फळ पिकाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येत आहे. यात महावेध माहिती (डेटा) नुसार ऑक्टोबर ते मार्च या कालावधीमध्ये जळगाव जिल्ह्यातील ८४  महसूल मंडळात सलग ५  दिवस तापमान ४५  डिग्री व त्यापेक्षा जास्त राहिले होते. यामुळे केळी पिकाला जास्त तापमानाचा फटका सहन करावा लागला होता. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असल्याने या शेतकऱ्यांना शासकीय निकषाप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

तसेच या पूर्वी जानेवारी महिन्यात सलग ३ दिवस कमी तापमानामुळे विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. वातावरणातील बदलामुळे कमी व जास्त तापमानामुळे झालेल्या एकूण नुकसान भरपाईची ३२७ ,५५,१५,१८४ रुपये एवढी एकत्रित रक्कम लाभ काही दिवसामध्ये जळगाव जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली.

नुकसान भरपाईस पात्र जळगाव जिह्यातील तालुका व महसूल मंडळे असे…

जळगाव : असोदा, भोकर, जळगाव, म्हसावद, नशिराबाद, पिंप्राळा.
भुसावळ : कुऱ्हे प्र.नशिराबाद, पिंपळगाव खु., वरणगाव.
बोदवड : बोदवड, करंजी, नाडगांव.
जामनेर : जामनेर, मालदाभाडी, नेरी बु., पहूर, फत्तेपूर, शेंदुर्णी, तोंडापूर, वाकळी
चोपडा : अडावद, चहार्डी, चोपडा, धानोरा प्र.अडावद, गोरगावले बु., हातेड बु., लासूर.
मुक्ताईनगर : अंतूर्ली, घोडसगाव, कुऱ्हे, मुक्ताईनगर.
रावेर : ऐनपुर, खानापूर, खिर्डी बू., खिरोदे प्र.यावल,, निंभोरा बू., रावेर, सावदा.
यावल : भालोद, बामणोद, फैजपूर, किनगाव बू., साकाळी, यावल.
अमळनेर : अमळगाव, अमळनेर, भरवस, मारवड, पातोंडा, शिरुड, वावडे.
भडगाव : आमडदे, भडगाव, कजगांव, कोळगांव.
चाळीसगाव : बहाळ, चाळीसगाव, हातळे, खडकी बु., मेहुणबारे, शिरसगांव, तळेगांव.
धरणगाव : चांदसर बु., धरणगाव, पाळधी बु., पिंप्री खु., साळवे, सोनवद बु.
एरंडोल : एरंडोल, कासोदा, रिंगणगांव, उत्राण गुजर हद्द
पाचोरा : गाळण बु., कुऱ्हाड खु., नगरदेवळे बु., नांद्रा, पाचोरा, पिंपळगांव बु., वरखेडी बु.
पारोळा : बहादरपूर, चोरवड, पारोळा, शेळवे बु., तामसवाडी.