तरुण भारत लाईव्ह । जळगाव शहरातील लांडोरखोरी येथे ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (वन्यप्राणी उपचार केंद्र) उभारण्याकरिता ८ कोटी ८८ लक्ष रुपये निधी मंजूर झाला असून लवकरच याची निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली आहे.
जळगाव शहर व परिसरात वन्यजीवांवरील उपचारासाठी वन्यप्राणी उपचार केंद्र सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. जळगावात ८ कोटी ८८ लाखांच्या निधीतून हे केंद्र उभारण्यात येणार आहे. जळगाव शहरातील मेहरूण तलाव येथे दरवर्षी फ्लेमिंगो व इतर प्रजातीचे पक्षी अधिवासासाठी येतात. संपूर्ण महाराष्ट्रात फक्त नागपूर येथे एकमेव टीटीसी सेंटर आहे. जळगाव शहरातील लांडोरखोरी येथे वन विभागाची जागा असून ते जळगावकरांच्या फिरण्यासाठी एक प्रमुख आकर्षणाचे केंद्र आहे. सदर टीटीसीचा प्रोजेक्ट लांडोखोरी येथे मंजूर झाल्यामुळे तेथील सौंदर्यात व जैव विविधतेत भर पडेल व पशु पक्ष्यांचे हाल होणार नाही ही भावना आ. भोळे यांनी राज्याचे वन मंत्री.ना.सुधिर मुनगंटीवार यांच्याकडे व्यक्त केली होती. या भावनेची तात्काळ दखल घेत वन विभागामार्फत जळगाव येथे टीटीसी सेंटरसाठी तत्वता मंजुरी देण्यात आली असून लगेचच त्यास प्रशासकीय मान्यता सुद्धा मिळाली आहे. लवकरच याची निविदा प्रक्रिया होऊन कामास प्रारंभ करण्यात येणार आहे. या केंद्रामुळे जळगाव शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. राज्यात आपले सरकार आल्यापासून रस्त्यांसाठी भरीव निधी आपल्याला मिळाला. त्याचसोबत आता शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सुद्धा निधी मिळत असल्याचा आनंद आहे. जळगाव शहरात एकमात्र मेहरूण तलाव सोडला तर नागरिकांना पर्यावरणात वेळ घालविण्यासाठी दुसरी चांगली जागा उपलब्ध नाही. याचा विचार करूनच हा प्रकल्प व अजून एक सुंदर स्थळ विकसित स्थळ विकसित करण्यासाठी लवकरच पर्यटन विभागाचा निधी सुद्धा शहराला मिळणार आहे.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने आ. सुरेश भोळे यांच्या निर्देशानुसार वन्यप्राण्यांच्या उपचारासाठी जळगाव येथे ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (वन्यप्राणी उपचार केंद्र) होण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. वाढती लोकसंख्या, जमिनीचा वापर करण्याची बदललेल्या पद्धतीमुळे वन्यप्राण्यांसाठी वनक्षेत्र अपुरे पडत असून, मानवी वस्तीत त्यांचा वावर वाढल्याने अपघाताने जखमी होण्याचा धोका अधिक आहे. त्यासाठी जखमी वन्य प्राण्यांसाठी हे उपचार केंद्र वरदान ठरणार आहे. वन्यप्राणी उपचार केंद्राचे पायाभूत सुविधा स्थापित केल्यानंतर सुयोग्य यंत्रणेमार्फत योग्य प्रणालीचा वापर करून उपचार केंद्राचे दैनंदिन प्रशासन व्यवस्थापन करण्यात येणार आहे.