जळगाव : जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अर्ज छाननीत शुक्रवारी 18 हरकती प्राप्त झाल्या आहेत. आ.मंगेश चव्हाण यांच्या अर्जावर मंदाकिनी खडसे यांनी, तर राष्ट्रवादीचे वाल्मीक पाटील, राष्ट्रवादीचेच संजय पवार यांनी एकमेकांच्या अर्जावर हरकत घेतली.
हरकतींवर रविवारी निर्णय
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत 18 उमेदवारी अर्जांवर घेतलेल्या हरकतींवर निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई रविवारी सुनावणी घेणार आहेत. याबाबत त्यांनी सांगितले, की सर्व 18 हरकतींवर आपण रविवारी सुनावणी घेऊन निकाल देणार आहोत. आपल्या निकालावर नाशिक विभागीय सहनिबंधक आयुक्तांकडे बुधवार (16 नोव्हेंबर)पर्यंत अपिल दाखल करता येईल.
जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी 182 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्या अर्जांची शुक्रवारी छाननी झाली. छाननीत सर्व अर्ज वैध ठरले. मात्र, 18 जणांच्या उमेदवारी अर्जांवर हरकती घेण्यात आल्या. त्यात मंदाकिनी खडसे यांनी भाजपचे आ.मंगेश चव्हाण यांच्या मुक्ताईनगर तालुक्यात दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली. सहकार कायद्याप्रमाणे एका तालुक्यातील उमेदवार दुसर्या तालुक्यातील मतदारसंघात अर्ज दाखल करू शकत नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्याची त्यांनी मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे वाल्मीक पाटील यांच्या धरणगाव तालुक्यातून दाखल केलेल्या अर्जावर हरकत घेतली आहे. ते पाचोरा तालुक्यात सभासद असताना, धरणगाव तालुक्यातून अर्ज दाखल करू शकत नाही, असा त्यांनी दावा केला. वाल्मीक पाटील यांनीही संजय पवार यांच्या अर्जावर हरकत घेतली. एक सभासद दोन तालुक्यांतून ठराव करू शकत नाही. पवार यांचे दोन तालुक्यांतून ठराव असून, त्यांचे नाव दोन तालुक्यांच्या मतदार यादीत आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच चोपडा तालुक्यातून दाखल रोहित निकम यांच्या अर्जावर इंदिरा पाटील यांनी हरकत घेतली. भुसावळ तालुक्यातील मतदारसंघातील उमेदवार आ.संजय सावकारे यांच्या उमेदवारीवरही हरकत घेण्यात आली.