Crime News : वाहनाच्या काचा फोडणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

यावल : सावखेडा सिम येथील रहिवाशी असलेल्या शेती व ठेकेदारीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीला अज्ञात हल्लेखोरांद्वारा मारहाण करण्याचा प्रयत्न झाला, तसेच त्यांच्या वाहनांच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथील कमलाकर तुळशीराम पाटील (वय ४७) हे बुधवार २० नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास यावल शहरापासून काही अतंरावर असलेल्या फॉरेस्ट नाका, विरावली रोड मार्गाने चारचाकी (एमएच १२, एमएम ९९००) ने आपल्या घरी जात होते. ते तंबाखू खाण्यासाठी फॉरेस्ट नाक्याजवळ थांबले होते, त्याचवेळी अचानक ३० ते ४० वयोगटातील ५ ते ६ जणांनी कमलाकर पाटील यांना मारहाण केली. पाटील हे एका उमेदवाराविरूद्ध पैसे वाटप करत असल्याच्या गैरसमज या मारहाण करणाऱ्यांना झाला होता. यातून त्यांनी पाटील यांची कॉलर पकडून शिवीगाळ करून लोखंडी रॉडने चारचाकी वाहनाच्या चारही बाजुच्या काचा फोडत त्यांच्या खिशातील पाकीट काढून घेतले. यानंतर या सर्वानी घटनास्थळावरून पळ काढला. याबाबत कमलाकर पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात या घटनेचा तपास सुरु आहे.