Yawal Crime News : मतदानासाठी पैसे घेणे भोवले, तिघांविरोधात गुन्हा दाखल

यावल : प्रशासनातर्फे मतदारांमध्ये पैशाच्या प्रलोभनाला बळी न पडण्याचा जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला होता. याकडे दुर्लक्ष करत एका मतदार हा  पैशांच्या प्रलोभनाला बळी पडला व त्याने मतदानाच्या हक्कावर गदा आणली म्हणून त्याचेविरुद्ध यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारत आदिवासी पार्टीचे उमेदवार सुनील तुकाराम भिल्ल यांनी निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांच्याकडे एक व्हिडिओ पाठवला होता. यानुसार पाटोळे यांनी याची शाहनिशा करण्याकरिता एक पथक निर्माण केले. हे पथक मनवेल गावाला पाठवले. तेथे पथकाने पोलीस पाटलांशी संपर्क करून व्हिडिओ दाखवत त्यातील व्यक्तींची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. त्यात एका व्यक्तीचे नाव जितेंद्र भिका कोळी असल्याचे आढळून आले.

जितेंद्र भिका कोळी (रा. दगडी मनवेल) याला पैसे घेण्यास प्रवृत्त करून मतदानाचा हक्क वापरण्याबद्दल पैसे देताना हा व्हिडिओ होता. तसेच जितेंद्र कोळी यांनी मतदानाचा हक्क वापरण्याबाबत रोख रक्कम स्वीकारून स्वतःच्या मतदानाच्या हक्कावर गदा आणल्याचे व्हिडिओ दिसून आले.  त्यामुळे शासकीय पथकातील कृषी पर्यवेक्षक नरेंद्र धोंडू जाधव यांच्या फिर्यादीवरून मंगळवार, १९ रोजी मध्यरात्री जितेंद्र कोळी आणि दोघे पैसे देणारे अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.