जळगाव, चंद्रशेखर जोशी : हिंदू खंडित न हो, बस संघटित चाहिए’..चा नारा देत ‘व्होट जिहाद’च्या लोकसभा निवडणूक काळातील अनुभवाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत खान्देशात जनमताने शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व काँग्रेसला जो धोबीपछाड दिला तो ‘न भूतो न भविष्यती’ असाच ठरला आहे. जळगाव जिल्ह्यात तर एकही जागा या पक्षांना मिळू शकलेली नाही. संपूर्ण ११ विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीने यश मिळविले आहे. मतदार हा सुजाण, सजग आणि दूरदृष्टीने पाहू लागला आहे, याचे हे द्योतक मानायला हवे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालाची केवळ राजकीय पक्षच नव्हे तर जनसामान्यांमध्येही उत्सुकता होती. याचे कारण होते लोकसभा निवडणुकीत बसलेला ‘व्होट जिहाद’चा फटका. त्या वेळी अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीला हा फटका बसला होता. मुस्लीम मतदारांनी एकगठ्ठा मतदान काँग्रेस व मित्र पक्षांना केले होते.
खान्देशातील धुळे आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघात तर याचे सर्वाधिक दुष्परिणाम बघायला मिळाले होते. अगदी विजयी घोषित होण्याच्या क्षणालाच मतमोजणीच्या एक-दोन फेऱ्यांनी बाजू पालटली, पारडे फिरविले अन् व्होट जिहादींनी दाखविलेल्या चमत्कारात डॉ. सुभाष भामरे पराभूत झाले. नंदुरबारात डॉ. हिना गावित यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. हे शल्य खान्देशातील हिंदुत्ववाद्यांच्या जिव्हारी लागले होते. ती खंत मनाला बोचत होती. मग ‘सजग रहों’ चा नारा दिला गेला, कार्यकर्ते मनापासून जिद्दीने कामाला लागले आणि विजय पताका अगदी सहज खेचून आणली गेली… ‘बटेंगे तो कटेंगे… एक रहे तो सेफ रहे…’ अशा स्फुरण देणाऱ्या वाक्यांनी हिंदू व्होट बँक एकवटली. हिंदू जागृत झाले. जातीभेदाच्या भिंती गळून पडल्या आणि ही एक वज्रमूठ तयार झाली. एकीचं बळ जणू नसानसात संचारलं आणि ठाम विश्वासानं साऱ्यांनी महायुतीला साथ दिली.
प्रगतीचा, उन्नतीचा, देशाच्या आणि राज्याच्या विकासाचा ध्यास केवळ महायुतीच घेऊ शकते हे ध्यानी घेऊन जनमत वळले, त्यामुळे हा विजय कोण्या राजकीय पक्षाचा किंवा कोण्या एका राजकीय व्यक्तीचा नसून प्रत्यक्ष धर्माचा हा विजय असल्याचेच म्हणावे लागेल. जळगाव जिल्ह्यात तर युतीने आघाडीला ‘अक्षरशः क्लीन स्वीप’ दिला. पाच भाजप, पाच शिवसेना शिंदे गट व एक राष्ट्रवादी अजित पवार गट, अशी विजयी पताका खान्देशात फडकली.
महाजन, गुलाबराव पाटील यांचे वर्चस्व सिद्ध
ग्रामविकासमंत्री, भाजप नेते गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची खान्देशावर पकड असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील हा विजय आहे. नंदुरबारात डॉ. विजयकुमार गावीत यांनी आणि जवळच्याच धुळे जिल्ह्यातही हिंदुत्ववादी विचारांचा तर दमदार नारा दिला होता. तो यशस्वी ठरला आहे. धुळे शहरात अनुप अग्रवाल व ग्रामीणमध्ये राम उपाख्य राघवेंद्र भदाणे यांनी प्रस्थापितांना जोरदार धक्का देत विजयश्री खेचून आणली आहे. जळगाव जिल्ह्यात मंत्री गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण, आ. सुरेश भोळे, आ. संजय सावकारे, अमोल जावळे तर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील, अमोल पाटील, आ. किशोर पाटील, चंद्रकांत पाटील व प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा आत्माभिमानी विजय झाला आहे.
‘सजग रहो’ चा नारा यशस्वी
मतदार जनजागृतीत हिंदुत्ववादी विचारांच्या संघटनांनी ‘सजग रहों’चा नारा दिला. या धर्मयुद्धात संघ स्वयंसेवक मोठ्या ताकदीने उतरला. या विजयाचे सर्वाधिक श्रेय या स्वयंसेवकांना द्यावे लागणार आहे. येथेच ‘एक है तो सेफ है’…ची प्रचिती आली. लोकसभेवेळी ज्या मतदारसंघांत ‘व्होट जिहाद’चा फटका बसला, तेथे या वेळी शक्ती एकवटली व त्याचे दृश्य परिणाम निकालात दिसून आले. धुळे जिल्ह्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत हिंदूंच्या विभाजनाने एमआयएमने बाजी मारली होती. ते शल्य सर्वांना होते. त्यामुळे या वेळी एकीने विजयश्री खेचून आणण्यात यश मिळाले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह अनेक लोकोपयोगी योजना गत काळात खान्देशात अतिशय यशस्वीपणे राबविल्या गेल्या. त्यामुळे लाडक्या बहिणींनी मनापासून साथ दिली. कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता त्या खंबीरपणे महायुतीच्या पाठीशी राहिल्या. परिणामी महिला मतदानात वाढ झालेली दिसली, हे वाढीव मतदान भाजपा महायुतीला लाभदायी ठरल्याचे सिद्ध झाले आहे.
दिवाळी अंकातून ‘जळगाव तरुण भारत’चे योगदान
निवडणुकीच्या या धामधुमीत दिवाळीची धावपळही सुरू होती. दिवाळीच्या या काळात आगळा- वेगळा विषय घेऊन दिवाळी अंक प्रकाशित करण्याची तरुण भारतची परंपरा राहिली आहे. त्यानुसार ‘बंगभूमी ते रझाकारी व्हाया बांगलादेश’ असा विषय घेऊन ‘तरुण भारत’ने दिवाळी अंक प्रकाशित केला. बांगलादेशात हिंदूंविरोधात तेथे घडलेल्या घडामोडी, हिंदूंवरील अत्याचार, हिंदू मूर्तीचे खंडन आणि मंदिरांची, धर्मग्रंथाची जाळपोळ, असे वस्तुनिष्ठ चित्रण या दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याचा वाचकांच्या मनावर नक्कीच परिणाम झाला असेल हे नमूद करणे क्रमप्राप्त आहे. अनेक मतदारसंघांमध्ये उमेदवारांनी हा दिवाळी अंक विकत घेऊन मतदारसंघात वाटला. सजग, राष्ट्रप्रेमी, राष्ट्राभिमानी वाचक हिंदू मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यात हे माध्यमही महत्त्वाचे ठरले. अनेक उमेदवारांनी या दिवाळी अंकाचा मोठा लाभ झाल्याचे सांगितले.