जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांची बँक आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात सुमारे २ लाख शेतकऱ्यांना १ हजार ५२ कोटींचे पीककर्ज वितरित करण्यात आले आहे.
आतापर्यंत स्थानिक विकास सोसायट्यांच्या ८७ हजार शेतकरी सभासदांकडे सुमारे ४७७ कोटींची थकबाकी असून आर्थिक वर्ष ३१ मार्चअखेर जास्तीत जास्त शेतकरी सभासदांनी नियमित व थकीत पीक कर्जाचा भरणा करावा. २९ ते ३१ मार्च दरम्यान साप्ताहिक व सार्वजनिक सुटी असली तरी जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमध्ये कर्जभरणा स्वीकारला जाणार असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी म्हटले आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनात शेतकरी सभासदांकडील नियमित व थकीत पीककर्ज परतफेड आवाहन व माहिती संदर्भात पत्रपरिषद पार पडली. या वेळी ते पुढे म्हणाले की, सांगली तसेच पुणे जिल्हा बँकेप्रमाणेच जळगाव जिल्हा बँकदेखील शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीककर्ज पुरवठा करीत आहे.
हेही वाचा : दोघांत तिसरा, संतापलेल्या नवऱ्याने योग शिक्षकाला सात फूट खड्ड्यात जिवंत पुरलं
पीककर्ज परतफेडीसाठी बँक शाखांमध्ये गर्दी
सद्यःस्थितीत पीककर्ज परतफेड करण्यासाठी बहुतांश शाखांमध्ये शेतकरी सभासदांच्या बऱ्याच प्रमाणावर रांगा लागलेल्या आहेत. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी शनिवार, २८ मार्च ते सोमवार, ३१ मार्चदरम्यान सलग साप्ताहिक व शासकीय सुट्या आहेत. परंतु या सुटी काळातदेखील शेतकऱ्यांना पीककर्ज भरणा सोयीचे व्हावा यासाठी जिल्हा बँकेच्या तालुका तसेच विविध शाखांमध्ये सकाळी आणि बँकेच्या कामकाजाचा कालावधी संपल्यानंतरदेखील पीककर्ज भरणा स्वीकारला जाणार असल्याचेही बँकेचे अध्यक्ष पवार यांनी म्हटले आहे.
प्रशासनाकडून होते साडेसहा कोटींचे उद्दिष्ट
जिल्हा प्रशासनाकडून राष्ट्रीयीकृत तसेच जिल्हा व खासगी बँकांना साडेसहा हजार कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी राष्ट्रीयीकृत बँकांकडून २ हजार २३९ कोटी ६७ लाख, तर जिल्हा बँकेकडून १ हजार ९११ कोटी ५५ लाख रुपये, असे बरोबरीचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.
बँकेकडून १०५२ कोटींचे पीककर्ज वाटप
जिल्हा बँकेकडून शेतकरी सभासदांना थेट तसेच विकासोमार्फत २ लाख शेतकऱ्यांना १०५२ कोटींचे कर्जवितरण केले आहे. त्यात १ लाख ५९ हजार शेतकरी सभासदांना ७१४ कोटी आणि ४१ हजार शेतकऱ्यांना २३८ कोटी रुपये थेट वैयक्तिक कर्ज पुरवठा केलेला असून विकासोमधील ८७ हजार सभासदांकडे ४७७कोटी रुपये थकबाकी आहे.
नियमित पीककर्ज परतफेडीस शून्य टक्के व्याज सवलत
जिल्हा बँकेकडून थेट तसेच स्थानिक विकास सोसायटी शाखेंतर्गत २ लाख शेतकऱ्यांना २०२४-२५ अंतर्गत १ हजार ५२ कोटींचे पीककर्ज वितरण केले आहे. या चालू पीककर्जाची परतफेड आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२५ पूर्वी करावी, जेणेकरून शेतकरी सभासदांना शून्य टक्के व्याज सवलतीचा लाभ मिळू शकेल. पीककर्ज भरणा केलेल्या शेतकरी सभासदांना एप्रिलच्या पहिल्या सप्ताहातच नवीन पीककर्ज उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असून शेतकरी सभासदांनी वेळेपूर्वी कर्ज परतफेड करून व्याज सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेच्या अध्यक्षांनी केले आहे.