जळगाव : शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याने यंदा प्रथमच पाणी सोडण्यात येणार आहे. सध्या बॅरेजमध्ये ६७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, याचा जळगाव, धरणगाव, यावल आणि चोपडा तालुक्यातील २५ गावांना मोठा लाभ होणार आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ही सुविधा लाभदायक ठरणार आहे.
शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बॅरेजमधील पुलांचे काम, भूसंपादन आणि बुडीत क्षेत्राशी संबंधित विविध कामांबाबतही चर्चा झाली. मंत्रिमंडळ बैठकीत याविषयावर सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
हेही वाचा : कमावलेली पुंजी गमावली; शेअर बाजारातील तोट्याने तरुणाने स्वतःला पेटवून जीवन संपवलं
बैठकीस मान्यवरांची उपस्थिती
या महत्त्वाच्या बैठकीला आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल जावळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (व्हीसीद्वारे), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शेळगाव बॅरेजमुळे या गावांना लाभ
बॅरेज प्रकल्पाच्या पाणीसाठ्यामुळे जळगाव, यावल, चोपडा आणि धरणगाव तालुक्यातील २५ हून अधिक गावे लाभार्थी ठरणार आहेत. या प्रकल्पामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल, तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
लाभार्थी गावे
जळगाव तालुका: आसोदा, भादली, ममुराबाद, शेळगाव, तुरखेडे, आमोदे, भोकर, कानसवाडे, आवार, घार्डी, भोलाणे, विदगाव, धानोरे, सुजदे, डीकसाई, करंज, लिधुर, किनोद.
यावल तालुका: टाकरखेडे, भालशिव, शिरागड.
चोपडा तालुका: पुनगाव, मितावली, पिंप्री, वडगाव, वटार सुटकार, खेडी, भोकरी, कोळंबे, सनफुले, कठोर, कुरवेल, निमगव्हाण, तावसे, खाचणे.
धरणगाव तालुका: धरणगाव शहर, नांदेड, पिंप्री, पथराड.
बॅरेज प्रकल्पाचा व्यापक प्रभाव
शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे पाणी शेतीसाठी तर उपयुक्त आहेच, परंतु पिण्यासाठीही हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे गावकऱ्यांना वर्षभर पुरेसा पाणीपुरवठा मिळेल आणि उन्हाळ्यात होणाऱ्या टंचाईवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल. आगामी काळात, प्रकल्पाची क्षमता वाढवण्यासाठी अद्याप अपूर्ण असलेल्या कामांना तृतीय सुप्रमा मिळावी यासाठी राज्य मंत्रिमंडळात सुधारित प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प आणखी प्रभावी होण्याची शक्यता आहे.