---Advertisement---

आजपासून शनिदेवाला ‘ब्रँडेड’ तेलाचाच अभिषेक; देवस्थान ट्रस्टचा महत्त्वपूर्ण निर्णय

by team
---Advertisement---

शनिशिंगणापूर : प्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानाने शनिदेवाच्या शिळेची झीज रोखण्यासाठी फक्त शुद्ध आणि ब्रँडेड तेलाचाच अभिषेक स्वीकारला जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून (1 मार्च) या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, यामुळे भाविकांनी कोणतेही भेसळयुक्त किंवा अनधिकृत तेल वाहू नये, असे आवाहन देवस्थान ट्रस्टकडून करण्यात आले आहे.

गेल्या 15 फेब्रुवारी रोजी देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला भाविक आणि स्थानिक नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा : कमावलेली पुंजी गमावली; शेअर बाजारातील तोट्याने तरुणाने स्वतःला पेटवून जीवन संपवलं

केमिकलयुक्त तेलामुळे शनिदेवाच्या शिळेवर परिणाम
शनिशिंगणापूर येथील शनिदेव मूर्तीस्वरूपात नसून स्वयंभू शिळा आहे. भाविक दररोज त्यावर तेल अभिषेक करत असतात. मात्र, अन्न व भेसळ तपासणी अहवालांनुसार असे आढळले की, भाविक वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यतेल, सुटे तेल किंवा मिश्रित तेल आणून अभिषेक करत असतात. या तेलांमध्ये केमिकल आणि भेसळ असल्याने शनिदेवाच्या शिळेवर नकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे शिळेची झीज रोखण्यासाठी आणि ती सुरक्षित ठेवण्यासाठी देवस्थानने फक्त प्रमाणित, शुद्ध आणि ब्रँडेड तेलच वाहण्याचा निर्णय घेतला आहे.

भाविकांसाठी नवीन नियमावली
भाविकांनी केवळ शुद्ध आणि ब्रँडेड तेलच वाहावे.
अज्ञात किंवा भेसळयुक्त तेल आणण्यास बंदी.
देवस्थानकडून प्रमाणित तेल उपलब्ध करून दिले जाणार.
नियम मोडणाऱ्या भाविकांवर कारवाई होऊ शकते.

भाविकांचा प्रतिसाद महत्त्वाचा
शनिशिंगणापूर देवस्थानाकडून या निर्णयाची माहिती जाहीर केल्यानंतर भाविकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही भाविकांनी या निर्णयाचे समर्थन करत, शिळेच्या संरक्षणासाठी आवश्यक पाऊल असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी हे बंधन कडक असल्याची भावना व्यक्त केली आहे. सध्या देवस्थान प्रशासनाकडून भाविकांना या निर्णयाबाबत जागरूक करण्यासाठी माहितीपत्रक आणि सूचना फलक लावण्यात आले आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment