Malegaon ED Raid : मालेगावमध्ये अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) तब्बल ९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यात बोगस जन्म प्रमाणपत्र प्रकरणात अटक असलेले तव्वाब शेख यांच्या राहत्या घरी देखील ईडीने छापा टाकला आहे.
मालेगाव महापालिकेत जन्म-मृत्यू नोंदणी विभागात कार्यरत असलेले तव्वाब शेख हे बोगस जन्म दाखला बनविल्या प्रकरणात अटकेत आहे. आता ईडीकडून त्यांच्या राहत्या घरी छापा टाकून झडती सुरू केली आहे. तर अंमलबजावणी संचालनालयाकडून मालेगावात एकाच वेळी एकूण ९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. महाराष्ट्र पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या १६ वेगवेगळ्या एफआयआरच्या आधारे ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, या प्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा थेट संबंध अवैध बांगलादेशी नागरिकांशी असल्याचे तपासात समोर आलं आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली होती. त्यांनी मालेगावातील बनावट कागदपत्रांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. किरीट सोमय्या यांच्या पाठपुराव्यानंतरच पोलिसांनी एफआयआर दाखल करून तपास सुरू केला होता, ज्यामुळे आता ईडीकडून कसून चौकशी होत आहे.त्यामुळे या चौकशीतून नेमकं काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मालेगाव म्हणजे रोहिंग्या मुसलमानांचा अड्डा : किरीट सोमय्या
राज्यात बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा सध्या खूपच गाजत आहे. यात मालेगाव केंद्रस्थानी असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बनावट जन्म दाखले वितरित झाल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यानुसार मालेगाव म्हणजे बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांना भारतीय करण्याचा अड्डा असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या आरोपानंतर या प्रकरणी शासनाने विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना केली होती. या समितीच्या चौकशीत बोगस जन्म दाखले वितरित झाल्याचे समोर येत कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत महसूल व वन विभागाचे सहसचिव अजित देशमुख यांनी तत्कालीन तहसीलदार नितीनकुमार देवरे व विद्यमान नायब तहसीलदार संदीप धारणकर यांना निलंबित करण्यात आले होते.