९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू, महाराष्ट्रातील ‘हे’ नेते राहणार उपस्थित!

दिल्ली : दिल्लीतील विज्ञान भवन आणि तालकटोरा स्टेडियमच्या ऐतिहासिक वातावरणात आजपासून 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला भव्य सुरुवात झाली आहे. या साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीनं झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन दुपारी 3.30 वाजता पार पडणार आहे. तब्बल 71 वर्षांनंतर देशाच्या राजधानीत होणाऱ्या या साहित्य संमेलनाची संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्यप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता आहे.

हे संमेलन केवळ साहित्याच्या प्रेमींना नव्हे, तर राजकीय स्तरावरही चर्चेचा विषय ठरले आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राजकीय आणि साहित्यिक क्षेत्रातील दिग्गज एकाच मंचावर येणार आहेत. याशिवाय, महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेतेही या संमेलनात सहभागी होणार आहेत.

98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. मराठी साहित्य क्षेत्रात त्यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून या प्रतिष्ठित पदावर त्यांची निवड करण्यात आली आहे. संध्याकाळी 6.30 ते 7.30 या वेळेत दुसरे उद्घाटन सत्र पार पडणार असून, यामध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, मंत्री उदय सामंत आणि भाजप नेते आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असेल. महाराष्ट्राच्या विविध पक्षांतील नेत्यांचा एकत्रित सहभाग हा साहित्य संमेलनासाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

मराठी साहित्य आणि संस्कृतीचा उत्सव

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी, 22 फेब्रुवारीला विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडप : ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या विषयावर मान्यवरांची मुलाखत, ‘लोकसाहित्य भूपाळी ते भैरवी’ – लोकसंगीताचा अनोखा प्रवास, ‘राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब’ – परिसंवाद, ‘मधुरव’ – संगीतमय सायंकाळ. यशवंतराव चव्हाण सभामंडप: ‘बहुभाषिक कवी संमेलन’ – विविध भाषांतील कवींचा संगम, ‘मराठी भाषा व महाराष्ट्र धर्म’ – परिसंवाद.

संमेलनात महाराष्ट्रातील अनेक दिग्गज राजकीय नेते सहभागी होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री  सुशील कुमार शिंदे, मंत्री उदय सामंत, भाजप नेते आशिष शेलार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे हे या संमेलनाच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार आहेत.

मराठी भाषेचा गौरव, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक शक्तीचे दर्शन!

दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत होणारे हे संमेलन म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेचा भव्य उत्सव आहे. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले लेखक, कवी, समीक्षक, कलाकार आणि साहित्यप्रेमी दिल्लीच्या भूमीत मराठीचा अभिमान घेऊन एकत्र येणार आहेत.

दिल्लीतील संमेलनामधून महाराष्ट्राची ओळख!

या संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध साहित्य परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन संपूर्ण देशाला घडणार आहे. मराठी भाषा, साहित्य आणि सांस्कृतिक परंपरेला नवा उर्जावर्धक बिंदू देणारे हे संमेलन मराठीप्रेमींसाठी अभिमानास्पद ठरणार आहे.