---Advertisement---
भारताने सिंधू पाणी करार ‘तात्पुरता निलंबित केल्यानंतर पाकिस्तानात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. या परिणामामुळे चिनाब नदीचा प्रवाह ९२ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. २९ मे रोजी चिनाबमध्ये पाण्याचा प्रवाह ९८.२०० क्युसेक होता, तो आता केवळ ७,२०० क्युसेक राहिला आहे. परिस्थिती आणखी गंभीर होताना दिसत आहे.
पाण्याची पातळी तीन हजार क्युसेकच्या मृतसाठ्यापेक्षाही खाली जाऊ शकते. यामुळे पंजाब आणि सिंध प्रांतातील ४० टक्क्यांपेक्षा जास्त पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. पाकिस्तानच्या कृषी मंत्रालयाने स्वतःच कबूल केले की, टर्वेला आणि मंगला यासारखी महत्त्वाची धरणे आता मृत पातळीच्या अगदी जवळ पोहोचली आहेत. परिणामी या वेळचा खरीप हंगाम अलिकडील इतिहासातील सर्वांत वाईट असू शकतो.
परिस्थिती बदलली नाही, तर शेतकरी इस्लामाबादकडे मोर्चा काढतील, असा इशारा पाकिस्तान किसान इत्तेहादने दिला आहे. पीकेआयचा दावा आहे की, पाणीटंचाईमुळे केवळ गव्हाच्या पिकाचे २२०० अब्ज रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. हे कृषी जीडीपीच्या २३.१५ टक्के आहे.
बिघडलेल्या परिस्थितीमुळे पाकिस्तान सरकार आणि लष्करावर शेतकरी संघटनांचा राग उफाळून आला आहे. पाकमधील तारबेला आणि मंगला धरणे जवळपास निम्मी रिकामी झाली आहेत. जगातील सातव्या सर्वांत मोठ्या मंगला धरणात आता केवळ २.७ दशलक्ष एकर-फूट पाणी उरले आहे. याची एकूण क्षमता ५.९ दशलक्ष एकर-फूट आहे. तारबेल्यातही केवळ सहा दशलक्ष एकर-फूट पाणी शिल्लक आहे. याच प्रकारे पाणीपुरवठा कमी होत राहिला, तर जमा झालेल्या पाण्याचा ५० टक्के हिस्साही संपून जाईल.