इराणमधील अणुतळ नष्ट करण्याची योजना आठवडाभरापूर्वीच आखण्यात आली होती. या कारवाईला ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’ असे नाव देण्यात आले आहे. इराणसोबत वाटाघाटी सुरू होत्या. हल्ल्याचा पर्याय हा अखेरचा होता. मात्र त्यांनी चर्चेचा प्रस्ताव नाकारल्याने रविवारी पहाटे इराणच्या तीन अणुतळांवर हल्ला करण्यात आला.
यासाठी १२५ लढाऊ विमानांचा समावेश असल्याची माहिती रविवारी अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट ह्युजेथ यांनी प्रसार माध्यमांना दिली. इराणवरील हल्ल्यानंतर काही तासातच पेंटागॉन अर्थात् अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या मुख्यालयात पत्रपरिषद आयोजित करण्यात आली.
यावेळी जॉईंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांची उपस्थिती होती. यावेळी ह्युजेथ म्हणाले, इराणविरोधात लष्करी कारवाई अतिशय अचूक आणि यशस्वी होती. या कारवाईला ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’ असे नाव देण्यात आले. या कारवाईत १२५ अमेरिकन लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रे सहभागी होती.
या हल्ल्याची योजना आठ दिवसांपूर्वीच आखण्यात आली होती. इराणने चर्चे साठी नकार दिल्यानेच हल्ल्याचा पर्याय निवडण्यात आला. यावेळी फोर्डों, नतान्झ आणि इस्फहान शहरातील अणुतळांवर हल्ले करण्यात आले. या तळांचा अणु कार्यक्रमाशी थेट संबंध होता. सर्वसामान्य नागरिकांना कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेऊनच कारवाई करण्यात आली.
हल्ल्याची सुरुवात शनिवारी सायंकाळी ६:४० वाजता सुरू झाली आणि सकाळी सात वाजेपर्यंत सर्व विमाने इराणी हवाई हद्द सोडून माघारी परतली होती.
पुतिन अराघची यांची भेट
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे रविवारी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना भेटण्यासाठी मॉस्कोला रवाना झाले. इराणच्या तीन प्रमुख अणुकेंद्रांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर अराघची म्हणाले, रशिया हा इराणचा मित्र आहे.