---Advertisement---
जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी पाकिस्तानातील दहशतावादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्याचा खात्मा केला. सुरक्षा दलाच्या वेढ्यात आणखी तीन अतिरेकी अडकले आहेत. सुरक्षा दल वर्षभरापासून जैशच्या या चार अतिरेक्यांच्या मागावर होते.
लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने गुप्तचर माहितीच्या आधारे बसंतगढ येथील दुर्गम बिहाली परिसराला वेढा घातला. यात चारही अतिरेकी अडकले शोधमोहीम सुरू केल्यानंतर चकमक झडली. त्यानंतर अधिक कुमक बोलवण्यात आली आणि हवामान प्रतिकूल असतानाही व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात आली.
सकाळी साडेआठ वाजता अतिरेक्यांसोबत संपर्क झाला. तो चार अतिरेक्यांचा गट असून, आम्ही वर्षभरापासून त्यांच्या मागावर आहोत, अशी माहिती जम्मू रेंजचे पोलिस महानिरीक्षक भीमसेन तुती यांनी पत्रकारांना दिली. सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने एका अतिरेक्याला ठार केले, अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली.









