---Advertisement---
जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील एका २७ वर्षीय तरुणाचा कंपनीत घातक व विषारी द्राव्याच्या संपकात आल्यान विषबाधा होऊन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय म हाविद्यालयात त्याच्यावर उपचार सुरू असताना मंगळवार, १ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला.
या प्रकरणी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विश्वनाथ शांताराम सोनवणे (वय २७, रा. कुसुंबा ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, विश्वनाथ सोनवणे हा आपल्या कुटुंबासह कुसुंबा गावात राहत होता.
शुक्रवार, २७ जून रोजी तो एमआयडीसीतील एका कंपनीत काम करत असताना, तो काहीतरी विषारी केमिकलच्या संपर्कात आला. यामुळे त्याला तीव्र विषबाधा झाली. त्याची प्रकृती बिघडत्याने त्याला तातडीने रात्री १० वाजता जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विश्वनाथवर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यानच मंगळवार, १ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता त्याचा मृत्यू झाला.
या घटनेने सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार सचिन पाटील हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. कंपनीत विषारी द्रव्याचा संपर्क कसा आला आणि सुरक्षिततेचे उपाय योजले होते का ? याबाबत पोलीस अधिक तपास करणार आहेत.