---Advertisement---
जळगाव : खेळता खेळता दोरीचा फास लागून एका १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. जळगावातील मुंदडानगर भागात ही घटना घडली. हार्दिक प्रदीपकुमार अहिरे (वय १३) असे मृत मुलाचे नाव आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेला अर्धी सुटी असल्याने हार्दिक दुपारी ३ वाजता घरी आला. जेवण झाल्यावर त्याने बाहेर खेळण्यासाठी आईकडे आग्रह धरला. मात्र, पाऊस असल्यामुळे आईने त्याला बाहेर जाण्यास मनाई केली. सायंकाळी ४.४५ च्या सुमारास हार्दिकची आई, धाकटा मुलगा प्रसाद याला घेऊन बाहेर गेली असताना, हार्दिक घराशेजारील पद्मसिंह परदेशी यांच्या घरी खेळायला गेला.
परदेशी यांच्या घराच्या पोर्चमध्ये प्रशिक्षणासाठी एक दोरी बांधलेली होती. हार्दिक त्याच दोरीजवळ खेळत असताना, त्याला अचानक त्या दोरीचा फास लागला आणि ही दुर्दैवी घटना घडली. पद्मसिंह परदेशी यांच्या पत्नी घरात असताना, त्यांना अचानक आवाज ऐकू आला, त्या धावत पोर्चमध्ये आल्या असता, त्यांना हार्दिक दोरीला फास लागलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी तत्काळ हार्दिकच्या आईला बोलवत एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
---Advertisement---
हार्दिकचे वडील प्रदीपकुमार अहिरे हे रावेर तालुक्यातील केहऱ्हाळा येथील माध्यमिक शाळेत शिक्षक आहेत, तर त्यांची आई गृहिणी आहेत. २ अहिरे दाम्पत्याला सुरुवातीला मूलबाळ नसल्याने त्यांनी २०१४ मध्ये पुणे येथील भारतीय समाज सेवा केंद्रातून हार्दिकला दत्तक घेतले होते. त्यानंतर काही वर्षांनी त्यांना एक मुलगाही झाला, जो आता सात वर्षांचा आहे. हार्दिक ओरियन शाळेत सातवीमध्ये शिकत होता. एक हुशार व 3 उत्साही मुलगा म्हणून त्याला ओळखले जात होते. या अनपेक्षित घटनेने अहिरे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.