---Advertisement---
जळगाव : पावसाळा सुरू होऊन काही दिवस झाले असताना डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले आहे. जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात १२२ संशयित रुग्णांचे नमुने तपासण्यात आले आहे. त्यापैकी २२ नागरिकांना डेंग्यूची लागण झाल्याचे जिल्हा हिवताप विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
हिवताप विभागाकडून ११ ते १४ जुलैदरम्यान एकूण २६ रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यामध्ये शहरी भागातील ३९, तर ग्रामीण भागातील ५७जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पारोळ्यात जून व जुलै महिन्यात ५ जणांना डेंग्यूची लागण झाल्याने डास निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. यामध्ये घरोघरी रुग्णांची तपासणी, औषध फवारणी, तसेच पाण्याच्या टाक्यांची तपासणी करण्यात आली. भडगाव व धरणगाव शहरातही जुलै महिन्यात प्रत्येकी २ जणांना डेंग्यूची लागण झाली होती. हिवताप विभागाकडून धूरफवारणी आणि साचलेल्या पाण्यावर औषध फवारणी करण्यात आली.
वेळेवर खबरदारी घेण्याचे आवाहन
दरम्यान, सध्याचे वातावरण डेंग्यू व चिकुनगुनियासाठी पोषक आहे. घरासमोर डबकी साचू देऊ नका. कूलरमधील पाणी नियमित बदला. छतावरील रिकाम्या भांड्यात पाणी साचल्यामुळेही डेंग्यूचे डास निर्माण होतात. त्यामुळे परिसरात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. नागरिकांनी वेळेवर खबरदारी घ्यावी, असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी केले आहे.
काय आहेत डेंग्यू आजारांची लक्षणे ?
डोळ्यांच्या खोबणीत वेदना, तीव्र डोकेदुखी, अंगावर पुरळ येणे, सांधेदुखी, भूक मंदावणे, उलट्यातून रक्त येणे, उलट्या होणे, रक्तमिश्रित काळसर संडास होणी, तोंडाला कोरड पडणे ही डेंग्यू तापाची लक्षणे आहेत.