---Advertisement---
भारतीय टपाल विभागाने डिजिटल युगातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार करत, पुढील पिढीतील अत्याधुनिक आयटी ॲप्लिकेशन सुरू करण्याची घोषणा केली आहे. या प्रणालीचा प्रारंभ मंगळवारी (२२ जुलै) होणार आहे. डिजिटल उत्कृष्टतेच्या दिशेने आणि नागरिकाभिमुख सेवांच्या विकासाकडे वाटचाल करणारा हा निर्णय स्वागतार्ह ठरणार आहे.
परिवर्तनाचा एक भाग म्हणून, एपीटी प्रणालीचा वापर जळगाव मुख्य डाकघरअंतर्गत सर्व टपाल कार्यालयांमध्ये २२ जुलैपासून करण्यात येणार आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे टपाल व्यवहार अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने पार पडणार आहेत. नवीन एपीटी ॲप्लिकेशन अंतर्गत ग्राहकांचा अनुभव अधिक सुलभ करण्यावर भर देण्यात आला आहे. या प्रणालीमुळे सेवा वितरणात गती येणार असून, स्मार्ट आणि भविष्यातील गरजांना पूरक अशा टपाल सेवा नागरिकांना मिळणार आहेत.
डिजिटल परिवर्तनाच्या या टप्प्यात नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून, होणाऱ्या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल विभागाने दिलगिरी व्यक्त केली आहे. ही सर्व पावले अधिक चांगल्या, वेगवान व डिजिटल सेवांच्या वितरणासाठीच उचलण्यात येत आहेत, असेही विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
जिल्ह्यात २१ जुलैला टपाल सेवा राहणार बंद
दरम्यान, प्रणाली स्थलांतर, पडताळणी आणि कॉन्फिगरेशन प्रक्रियेच्या अनुषंगाने २१ जुलैला जळगाव मुख्य डाकघरअंतर्गत येणाऱ्या सर्व टपाल कार्यालयांमध्ये सेवा बंद राहणार असल्याची माहिती डाकघर अधीक्षकांनी दिली. या दिवशी कोणतेही टपाल व्यवहार होणार नसल्यामुळे नागरिकांनी कामांचे नियोजन योग्य पद्धतीने करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.