---Advertisement---

मंदिरांचे नियंत्रण अन् व्यवस्थापन हिंदूंच्या हाती हवे, ‘विहिंप’चे राष्ट्रीय महामंत्री बागडा : आंतरराष्ट्रीय बैठकीत चर्चामंथन

---Advertisement---

देशातील जगप्रसिद्ध मंदिरांवर शासनाचे नियंत्रण असून, मंदिरांचे नियंत्रण व व्यवस्थापन हिंदूंकडे देऊन मंदिरात दान येणाऱ्या धनसंपत्तीचा उपयोग हिंदू समाजहितासाठी व्हावा. तसेच व्यसनाधीन युवक देशासाठी गंभीर मुद्दा आहे. यासाठी बजरंग दल व दुर्गा वाहिनीतर्फे जनजागृतीपर विशेष अभियान राबविले जाईल. यांसह इतर विषयांवर जळगावातील केंद्रीय प्रबंध समितीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील बैठकीत चर्चामंथन होऊन अभियानाची दिशा ठरविली जाईल, असे विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री बजरंग लालजी बागडा यांनी सांगितले.

शहरातील एमआयडीसी परिसरातील बालाणी लॉन्सच्या नवीन इमारतीत अखिल भारतीय विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय प्रबंध समितीची आंतरराष्ट्रीय स्तरावरील बैठक होत आहे. यानिमित्त शुक्रवारी (१८ जुलै) दुपारी श्री. बागडा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेच्या अखिल भारतीय प्रचार समितीचे विजय शंकर तिवारी, देवगिरी प्रांतमंत्री योगेश्वर गर्गे, भय्यालाल आदी उपस्थित होते.

बैठकीत आगामी दोन दिवसांत कोणकोणत्या विषयांवर चर्चामंथन होईल याविषयी श्री. बागडा यांनी माहिती दिली. श्री. बागडा म्हणाले की, बैठकीला केंद्रीय पदाधिकारी, क्षेत्रीय, सर्व प्रांतांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी असून, सुमारे ४०० पदाधिकारी उपस्थित राहतील. हिंदू समाजासमार अनेक आव्हाने आहेत. त्यांना समोरे देण्यासाठी आगामी कार्यक्रम, अभियानाची रूपरेषा बैठकीत ठरविली जाईल.

देशातील मंदिरे शासन नियंत्रणमुक्त व्हावीत

देशभरातील प्रसिद्ध हिंदू मंदिरांवर राज्य व केंद्र शासनाचे नियंत्रण आहे. मंदिरांचे व्यवस्थापन व नियंत्रण पूर्णतः हिंदू समाजाकडे असावे. मंदिरात येणाऱ्या दान व देणगीरूपी धनसंपत्तीचा उपयोग फक्त हिंदू समाजाच्या कल्याणासाठी केला जावा. ब्रिटिशकालीन कायद्यांमध्ये बदल करून मंदिरे शासनाच्या नियंत्रणातून मुक्त व्हावीत, असे श्री. बागडा यांनी स्पष्ट केले.

देशभरातील धर्मांतर

रोखण्याची गरज श्री. बागडा यांनी होत असलेल्या धर्मांतरावर भाष्य केले, बांगलादेशातून मोठ्या संख्येने घुसखोरी होत असल्याचे सांगत देशात धर्मांतर होण्याचे प्रकार वाढले आहेत. हिंदू समाजाची अस्मिता वाचविण्यासाठी अवैध पद्धतीने होणारे धर्मांतर रोखण्याची गरज आहे. अनेक हिंदू बांधवांना वेगवेगळी आमिषे, पैशांची आशा लावून धर्मांतर करण्यासाठी भाग पाडले जाते. ते षड्यंत्र आहे. यासाठी बजरंग दल व दुर्गा वाहिनी यांच्यातर्फे देशभर जनजागृती अभियान राबविले जात आहे. गोमातांचे संरक्षण, युवतींच्या संरक्षणासाठी बजरंग दल व दुर्गा वाहिनी कार्यरत आहेत, असे ते म्हणाले.

युवकांमध्ये व्यसनाधीनता चिंताजनक

श्री. बागडा यांनी देशातील युवक व्यसनाच्या आहारी गेल्याच्या मुद्यावर चिंता व्यक्त केली. देशभरातील युवक व्यसनाच्या आहारी जात आहेत. हा विषय आता चिंताजनक झाला आहे. ही देशासमोर मोठी समस्या आहे. युवकांना व्यसनांपासून रोखण्यासाठी राष्ट्रव्यापी नशामुक्ती अभियान राबविले जाईल. अभियानाला अंतिम रूप देण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे युवा संघटन, बजरंग दल, दुर्गा वाहिनी प्रामुख्याने सहभाग होईल. याअंतर्गत शाळा महाविद्यालय व विविध समाजघटकांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविले जातील. यासाठी शासन-प्रशासनासोबत समन्वय बैठका घेण्यात येतील.

जनजागृती, निवेदन अन् आंदोलनाची तयारी

जळगावात होत असलेल्या अखिल भारतीय विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय प्रबंध समितीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील बैठकीत हिंदू समाजहितासाठी मंदिरे शासन नियंत्रणमुक्त व्हावीत, युवकांना व्यसनांपासून रोखणे, धर्मांतर या प्रमुख मुद्यांसह विविध विषयांवर चर्चामंथन करीत, शासन-प्रशासनाशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्यासाठी दिशा ठरविली जाणार आहे. त्यानंतर जनजागृती अभियानासह आवश्यक असल्यास शासन-प्रशासनाला निवेदने आणि आवश्यकतेनुसार आंदोलनही केले जाईल, असे विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री बजरंग लालजी बागडा यांनी सांगितले.

देशात दहशतवाद धोकादायकच

जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे काही महिन्यांपूर्वी झालेला हिंदूंवरील दहशतवादी हल्ला देशासाठी संतापजनकच होता. परकीय शक्तींचे त्यात षडयंत्र होते. दहशतवादाचा धोका पूर्वी अमेरिकेला होता. आता भारताला आहे. दहशतवादाला पोसणे कोणत्याही देशाला नुकसानकारकच आहे. यामुळे जगभरातील देशांनी दहशतवादाचा विरोध केला पाहिजे, असे श्री. बागडा यांनी नमूद केले.

देशात हिंदू बांधवांच्या संख्येत घट

भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा देशात हिंदूंची संख्या ९० टक्के होती. आता ती ७० टक्क्यांपर्यंत घटली आहे. हा मोठा चिंतेचा विषय आहे. हिंदूंची वृद्धी कमी होत असल्याची विविध कारणे आहेत. धर्मांतरासह बांगलादेशातून भारतात होणारी घुसखोरी ही प्रमुख कारणे आहेत. ९९ टक्के धर्मांतर अवैध पद्धतीने होतात. धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनांनी पुढाकार घेत पावले उचलण्याची आवश्यकता आहे. यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी जनजागृती करीत आहे, असेही श्री. बागडा यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---