---Advertisement---
Sawada Crime News : लहान मुले पळविण्याच्या संशयावरुन दोन जणांना नागरिकांनी चोप दिल्याचा प्रकार घडला आहे. रावेर तालुक्यातील मुंजलवाडी, कुसुंबा आणि लोहारा येथे हा प्रकार घडला. जडीबुटी विकणारे दोन जण या परिसरात जडीबुटी विकण्यासाठी आले होते मात्र, गैरसमजूतीचे ते बळी ठरले. मारहाणीत दोघे जण जखमी झाले असून दोघे हरियाणातील रहीवाशी असल्याचे समोर आले आहे.
या बाबत माहिती अशी की, हरियाणातून जडी-बुटी विकण्यासाठी रावेर तालुक्यात आले आहेत. यातील जस्सानाथ पुनुनाथ (वय 60) आणि मोनूनाथ जस्सानाथ (वय 20, दोन्ही राहणार सिरसा, हरियाणा) हे आज सकाळी रावेर तालुक्यातील मुंजलवाडी या गावात आले होते. गावातील एका व्यक्तीला नसा दुखण्याचा त्रास असल्याने त्यांनी त्या व्यक्तीची तपासणी केली. यानंतर तो व्यक्ती घरी जाऊन इतर लोकांना घेऊन आला. हरियाणातील हे दोन व्यक्ती मुले पळवणाऱ्या टोळीतील असल्याच्या गैरसमज लोकांना झाला आणि या गैरसमजतीतून लोकांनी त्यांना मारहाण सुरू केली. यामुळे या दोन्ही जणांनी त्यांच्याकडे असलेल्या एचआर 13 ई 6516 क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून पलायन केले.
यानंतर हे दोन्ही जण प्रचंड वेगाने मुंजलवाडी सोडून कुसुंब्याकडे पळाले. तेथे लोकांनी त्यांना अडवून पुन्हा मारहाण केली. तेथून आपला जीव वाचवून ते वेगाने पळाले असतांना त्यांचा एका व्यक्तीला कट लागला. यानंतर लोहारा येथे त्यांना गाठून पुन्हा मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या चारचाकी वाहनाती तोडफोड देखील करण्यात आली असल्याची समजते.
दरम्यान, सावदा पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने या दोन जणांनाची सुटका झाली. सावदा पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास स.पो.नी. विशाल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस करीत आहे. स.पो.नी. विशाल पाटील यांनी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन देखील केले आहे.