---Advertisement---
---Advertisement---
अमरावती : येत्या काळात लवकरच सुमारे साडेपाच हजार प्राध्यापकांसह विद्यापीठांतील २ हजार ९०० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही पदे भरण्यात येणार आहेत, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे केली. त्यामुळे
राज्यभरातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी मोठी आशा निर्माण झाली आहे.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल्स असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट कॉलेजेसचे ४०वे वार्षिक राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पाटील म्हणाले की, प्राध्यापक व साहाय्यक प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्तपदांबाबत आता तोडगा काढला आहे.
---Advertisement---
प्राचार्यांच्या संघटनेने कामगार युनियनसारखे प्रश्न मांडल्याची खंत चंद्रकांत पाटील यांनी या वेळी अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल्स असोसिएशनचे उपाध्यक्ष प्राचार्य नंदकुमार निकम यांना उद्देशून खंत व्यक्त केली.
मंत्री पाटील म्हणाले की, शासनाने घेतलेल्या निर्णयांचा कोणताही संदर्भ न देता प्राचार्य नंदकुमार निकम यांनी केवळ प्रलंबित असलेल्या निर्णयांवरच भाषण दिले. खरे म्हणजे प्राचार्य व प्राध्यापकांच्या संघटनांनी कारखान्यातील कामगारांच्या युनियनप्रमाणे मागण्या मांडणे अपेक्षित नाही, अशी खोचक टीका केली. तसेच ‘तुम्ही एक दिवस मंत्री होऊन पहा, मग निर्णय घेतानाच्या अडचणी लक्षात येतील. तरीही तुमच्यासारख्यांना संघटनेचे नेतृत्व करता यावे, म्हणून काही मागण्या प्रलंबित ठेवतो’, असाही चिमटा चंद्रकांत पाटील यांनी घेतला. त्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.