---Advertisement---
---Advertisement---
नंदुरबार : बोगस शालार्थ आयडी संदर्भातील प्रकरणात काही अधिकारी व कर्मचारी यांना कोणतीही चौकशी न होता अटक केली जात असल्याच्या निषेधार्थ अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने शुक्रवारी एकदिवसीय सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले. दरम्यान, मागण्यांची दखल घेतली नाही किंवा लेखी आश्वासन शासनाने दिले नाही तर ८ ऑगस्टपासून बेमुदत सामुहिक रजा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
निवेदनाचा आशय असा आहे की, नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी देण्याचा गुन्हा दाखल होऊ कारवाई केली जात आहे. या प्रकरणात काही अधिकाऱ्यांना विनाकारण गोवले जात आहे. कायद्याने दिलेले संरक्षण नाकारून अटक केली जात आहे. यामुळे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये दहशत पसरून भीतीचे वातावरण पसरले आहे. याच्या निषेधार्थ विभागातील शिक्षण अधिकाऱ्यांना विभागाच्या परवानगीशिवाय विनाचौकशी अटकेपासून संरक्षणाची लेखी हमी मिळत नाही, तोपर्यंत संघटनेतर्फे आंदोलन केले जाणार आहे. त्याचा पहिला टप्पा हा शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी एकदिवसीय सामूहिक रजा आंदोलनाने झाली. याशिवाय एसआयटी चौकशी पूर्ण होईपर्यंत शिक्षक-शिक्षकेतर वेतन देयकांवर प्रतिस्वाक्षरी करण्यात येणार नाही.
अतिरिक्त व्हिडीओ कॉन्फरन्स व सुटीच्या दिवशी अतिरिक्त काम केले जाणार नाही. लेखी आश्वासन मिळाले नाही, तर ८ ऑगस्टपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन केले जाणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्यांमध्ये शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, नीलेश लोहकरे, वंदना वळवी, पी. बी. नखाडे, प्रवीण अहिरे यांचा समावेश होता.