---Advertisement---
जळगाव : रुग्णवाहिका न मिळाल्याने मजूर महिलेची खासगी गाडीतच प्रसुती झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काजल प्रकाश जाधव असे या महिलेचे नाव असून, यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. दरम्यान, शासनातर्फे आरोग्यासाठी करोडो रुपये दिले जातात. मात्र तरीही जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आजारी असून तिला उपचाराची गरज असल्याचे बोलले जात आहे.
चाळीसगावच्या अंधारी येथील काजल प्रकाश जाधव या ऊसतोड मजूर महिलेला रुग्णवाहिका न मिळाल्याने अखेरीस या मजूर महिलेची खासगी गाडीतच प्रसुती झाली. पोटदुखीच्या तक्रारीमुळे तातडीने उपचारासाठी तळेगाव आरोग्य उपकेंद्रात नेण्यात आले. मात्र, तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोणतीही प्राथमिक वैद्यकीय मदत न करता तिला थेट ट्रामा केअर सेंटर, चाळीसगाव येथे नेण्याचा सल्ला दिला.
विशेष म्हणजे, आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली नाही. तसेच रुग्णासोबत जाण्यासाठी परिचारिकाही उपलब्ध करून दिली गेली नाही. आरोग्य व्यवस्थेच्या या भोंगळ कारभारामुळे महिलेची परिस्थिती अधिक गंभीर झाली. कुटुंबियांनी खासगी वाहनाची व्यवस्था करून तिला चाळीसगाव येथे नेत असताना, वाटेतच गाडीत प्रसूती झाली.
गरिबाचा कोणी वाली आहे की नाही?
गरीब आणि मजूर महिलेच्या मदतीला शासनाची कोणतीही यंत्रणा आली नाही. १०८ रुग्णवाहिका इतर रुग्णांना सहज उपलब्ध होते. मात्र या गरीब महिलेला ही सुविधाही मिळाली नाही. अखेरीस खाजगी वाहनाने तिला रुग्णालयात नेण्याची वेळ आली. कोणतेही शासकीय उपचार न घेता तिची खाजगी वाहनातच प्रसुती झाल्याची खंत महिलेच्या नातेवाईकांनी बोलून दाखवली.