---Advertisement---
नंदुरबार : शहादा-शिरपूर प्रवास करणाऱ्या सराफा व्यावसायिकाच्या बॅगमधून १८ लाख ५६ हजार रुपयांचे दागिने चोरणाऱ्या एका संशयितास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून १६ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मगन चिमा वसावे ता. (वय २४, रा. खरवडचा आगरबारीपाडा, धडगाव) असे संशयिताचे नाव आहे.
पोलिस सूत्रांनुसार, १० एप्रिल रोजी परेश मुकेश कोठारी (वय ३५) रा. कांदिवली, मुंबई हे शहादा येथे दागिने विक्रीसाठी आले होते. दुपारी शहादाकडून शिरपूरकडे एका कालीपिली वाहनाने (क्रमांक एमएच १८ एन ६५७७) जात असताना त्यांनी दागिने असलेली त्यांची बॅग वाहनाच्या कॅरीवर ठेवली होती. बॅगेत १८ लाख ५६ हजार ३१० रुपयांचे सोन्याचे दागिने होते. ते दागिने संशयित मगन वसावे याने चोरले.
याबाबत कोठारी यांनी २८ जून रोजी सारंगखेडा पोलिसात याबाबत फिर्याद दिली होती. त्याचा तपास एलसीबीकडून सुरू असताना पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना संशयित हा शहाद्यात फिरत असल्याची माहिती मिळाली.
धान्य मार्केटच्या मागील बाजूस पथकाने शोध घेतला असता मनग वसावे हा आढळून आला. त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून एकूण १६ लाख ९५ हजार ६० रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. उर्वरित दागिन्यांचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक हेमंत पाटील, सारंगखेडा ठाण्याचे सहायक निरीक्षक रमेश वावरे, उपनिरीक्षक किरण बान्हे, मुकेश पवार, हवालदार पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, विकास कापुरे, अविनाश चव्हाण, शोएब शेख, सतीष घुले, भरत उगले यांनी केली.